गडचिरोली : जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक शाळा जीर्णावस्थेत असून कधीही कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता आहे. मात्र सदर इमारती निर्लेखीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे केवळ ३४ प्रस्ताव यावर्षी प्राप्त झाले असून त्यापैकी सुमारे २५ प्रस्तावांमध्ये त्रूटी असल्याने सदर प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. केवळ ९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश शाळा राज्यनिर्मितीच्या सुरूवातीच्या कालावधीत बांधण्यात आल्या. सदर इमारती कौलारू आहेत. यापैकी बहुतांश इमारतींचे फाटे कुजले आहेत. त्याचबरोबर भिंतीला झडप लागून भिंतीवरील सिमेंट उखडून गेले आहे. पायाही कमजोर झाला आहे. त्यामुळे सदर इमारत कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला असल्याने सदर इमारती निर्लेखीत करण्याविषयी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्रस्ताव मागितले आहेत. जिल्ह्यात जवळपास ४०० पेक्षा अधिक शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. मात्र केवळ ३४ शाळांनी निर्लेखीत करण्याविषयी प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविले आहेत. त्यातही सुमारे २५ प्रस्तावांमध्ये विविध प्रकारच्या त्रूटी आढळून आल्या आहेत. तर काही प्रस्तावांना अपूर्ण दाखले जोडण्यात आले आहेत. त्यामुळे सदर प्रस्ताव नामंजूर करण्यात आले असून केवळ ९ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. शाळांच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पैसा उपलब्ध आहे. मात्र जुनी इमारत पाडल्याशिवाय त्या ठिकाणी नवीन इमारत उभी करणे शक्य नाही. मात्र निर्लेखीत करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने प्रस्तावच सादर केले जात नाही. (नगर प्रतिनिधी)
शाळा निर्लेखनाचे केवळ ३४ प्रस्ताव
By admin | Published: November 17, 2014 10:53 PM