लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातील जनतेला विमा संरक्षण प्राप्त व्हावे, यासाठी केंद्र शासनाने सुरक्षा विमा योजना व जीवनज्योती योजना सुरू केल्या आहेत. सुरूवातीच्या कालावधीत या योजनांची चांगली प्रचार प्रसिध्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या योजनांतर्गत विमा काढला. त्यानंतर मात्र प्रशासनाने प्रचार प्रसिध्दी थांबविल्याने विमा काढणे बंद झाले आहे. पाच वर्षांचा कालावधी उलटूनही केवळ २० टक्के जनतेचा विमा काढण्यात आला आहे.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवनज्योती योजना या विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुचविलेल्या विशेष योजना आहेत. योजनांची सुरूवात २०१५ मध्ये करण्यात आली. सुरूवातीच्या कालावधीत या योजनांची मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिध्दी करण्यात आली. अत्यंत कमी प्रिमीअममध्ये या दोन्ही योजनांचा लाभ घेता येत असल्याने अनेक नागरिकांनी विमा काढला. त्यानंतर मात्र केंद्र शासन, राज्य शासन व प्रशासनाने सुध्दा या योजनांच्या प्रचार प्रसिध्दीकडे दुर्लक्ष केले. परिणामी विमा काढणाऱ्यांची संख्या पाहिजे, त्या प्रमाणात वाढू शकली नाही. योजना सुरू होऊन चार वर्षांचा कालावधी उलटत चालला तरी केवळ २० टक्के जनतेनेच विमा काढला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाखांपेक्षा अधिक आहे. किमान ९ लाख लोकसंख्येचा विमा उतरविणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत केवळ १ लाख ३९ हजार ६७४ नागरिकांनी विमा काढला आहे. तर जीवन ज्योती योजनेंतर्गत ६२ हजार ९७२ नागरिकांचा विमा निघाला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत वर्षाचे केवळ १२ रुपये प्रती वर्ष भरावे लागतात. तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत वार्षिक केवळ ३३० रुपये भरावे लागतात.विशेष म्हणजे, या योजनांतर्गत बँकेमध्ये जाऊन पैसे भरावे लागत नाही. संबंधित व्यक्तीच्या बचतखात्यातून विम्याची रक्कम काढली जाते.वार्षिक १२ व ३३० रुपयांमध्ये मिळते विमा संरक्षणगरीबातील गरीब व्यक्तीचा विमा काढला जावा, या उद्देशानेच केंद्र शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेंतर्गत वर्षाचे केवळ ३३० रुपये बँक खात्यातून कपात केले जातात. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत केवळ १२ रुपये कपात होतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत १८ ते ७० वर्षापर्यंतच्या व्यक्तीचा विमा काढला जातो. अपघात होऊन मृत्यू झाल्यास संबंधिताच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ आधार कार्ड व संबंधित व्यक्तीचे बचत खाते असणे आवश्यक आहे. ३१ मे च्या पूर्वी संबंधित व्यक्तीच्या खात्यातून पैसे कपात केले जातात. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेंतर्गत १८ ते ५० व्यक्तींचा विमा काढला जातो. विमा कालावधीत संबंधित व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांचा विमा दिला जातो.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा सुरक्षा योजना या दोन्ही योजनांतर्गत अत्यंत कमी पैशात सर्वसामान्य व्यक्तीचा विमा काढला जातो. एकदा विमा काढल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बचत खात्यातून विम्याची रक्कम कपात केली जाते. त्यामुळे वेळोवेळी बँकेत जाण्याचीही गरज पडत नाही. जास्तीत जास्त नागरिकांचा विमा उतरविला जावा, असे निर्देश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.- सतीश आयलवार, सीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोलीसरकारच्या दुर्लक्षानंतर प्रशासन सुस्तसुरूवातीचा एक वर्ष केंद्र शासनाने प्रत्येक बँक व विभागांना टार्गेट देण्यात आले होते. त्यामुळे विमा काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत होत्या. एक वर्षाच्या कालावधीनंतर मात्र केंद्र शासनाने या योजनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रशासनाने सुध्दा पाठ फिरविली. अत्यंत कमी हप्त्यात या योजनांचा लाभ घेता येतो. त्यामुळे योजनाधारकांची संख्या वाढली असती. मात्र प्रचार प्रसिध्दीअभावी या योजना आता अनेकांच्या विस्मरणात गेल्या आहेत. त्यामुळे योजनांचा विस्तार थांबला आहे.
केवळ २० टक्के जनतेचा सरकारी विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:21 AM
देशातील जनतेला विमा संरक्षण प्राप्त व्हावे, यासाठी केंद्र शासनाने सुरक्षा विमा योजना व जीवनज्योती योजना सुरू केल्या आहेत. सुरूवातीच्या कालावधीत या योजनांची चांगली प्रचार प्रसिध्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या योजनांतर्गत विमा काढला.
ठळक मुद्देदोन लाख नागरिकांचा विमा : योजनांचा प्रसार-प्रचार थांबला