अतुल बुराडे।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : पूर्वीच्या चिमूर आणि आताच्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात सन १९६७ पासून २०१९ पर्यंत १४ सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या एकूण १४ उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी ५० टक्केपेक्षा जास्त मते मिळविली. विशेष म्हणजे आधीच्या चिमूर लोकसभा मतदार संघाचे दुसरे खासदार कृष्णराव ठाकूर यांनी ६८.५० टक्के मते प्राप्त केली. चिमूर लोकसभा मतदार संघात झालेल्या आजपर्यंतच्या १४ लोकसभा निवडणुकीनंतरही कृष्णराव ठाकूर यांचा हा विक्रम आजही कायम आहे.मतदारांनी केलेल्या एकूण मतदानाच्या ५० टक्केपेक्षा अधिक मते घेत पाच उमेदवारांनी खासदारकीची लढाई जिंकली. उर्वरित नऊ खासदारांना विजय मिळाला असला तरी त्यांना मिळालेली मते ५० टक्क्याच्या आत आहेत.पाचव्या लोकसभा निवडणुकीत सन १९७१ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून लढलेले काँग्रेसचे कृष्णराव ठाकूर यांनी झालेल्या एकूण मतदानाच्या तब्बल ६८.५३ टक्के मते घेऊन विजय मिळविला होता. चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रामधून सन १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कृष्णराव ठाकूर दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. या निवडणुकीत सुद्धा त्यांनी ५३.८७ टक्के मते घेतली.सन १९८० च्या सातव्या लोकसभा निवडणुकीत चिमूर मतदार संघातून काँग्रेसचे विलास मुत्तेमवार विजयी झाले. मुत्तेमवार यांना त्यावेळी ५७.५३ टक्के मते मिळाली होती. सन १९८४ मध्ये आठवी लोकसभा निवडणूक झाली. यात काँग्रेसचे विलास मुत्तेमवार दुसऱ्यांदा खासदार झाले. याही निवडणुकीत मुत्तेमवार यांनी चिमूर क्षेत्रात ५१.९३ टक्के मते घेऊन विजय मिळविला.सन १९७१, सन १९७७, सन १९८० व सन १९८४ अशा सलग चार लोकसभा निवडणुकांत विजयी चारही उमेदवारांनी या प्रत्येक निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानाच्या ५० टक्के पेक्षा अधिकची मते मिळवित निवडणुकीचा रणसंग्राम जिंकला. त्यानंतर तब्बल ३० वर्षांनी सन २०१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून भाजपाकडून लढलेले अशोक नेते यांनी ५२.११ टक्के मते प्राप्त करीत ही निवडणूक जिंकली.चिमूर, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आजपर्यंतच्या एकूण १४ सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या १४ उमेदवारांमधून पाच उमेदवारांना ते लढलेल्या त्या-त्या निवडणुकींमध्ये झालेल्या एकूण मतदानाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते प्राप्त करता आली. विशेष म्हणजे, तीनच उमेदवारांनी पाच निवडणुकींमध्ये प्रत्येकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते घेतली. यात कृष्णराव ठाकूर, विलास मुत्तेमवार यांनी दोन-दोन वेळा तर अशोक नेते यांनी एकदा ५० टक्क्यांच्या वर मते घेतली आहेत.सन १९६७ पासून चिमूर आणि सन २००९ नंतरच्या गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून २०१९ पर्यंतच्या एकूण चौदा सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण १५४ उमेदवार होते. यामधून १४ उमेदवार विजेते ठरले.नेते यांच्या पदरात ४५.५० टक्के मतेयंदा सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर या मतदार संघातून भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना एकूण ५ लाख १९ हजार ९६८ मते प्राप्त झाली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांचा ७७ हजार ५२६ मतांनी पराभव केला. उसेंडींना ४ लाख ४२ हजार ४४२ मते मिळाली. अशोक नेते यांना २०१४ च्या निवडणुकीत ५२.११ टक्के मिळाली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत त्यांना प्राप्त झालेल्या मताची टक्केवारी ४५.५० आहे.चिमूर क्षेत्रात देसाईगंज, आरमोरी तालुक्याचा समावेशसन १९६७ पासून २००८ पर्यंत चिमूर लोकसभा क्षेत्र होते. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीपासून गडचिरोली-चिमूर अशा पद्धतीने लोकसभा क्षेत्राची पुनर्रचना झाली. १९६७ पासून २००४ या कालावधीत ११ सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. २००४ पर्यंत चिमूर या जुन्या लोकसभा क्षेत्रात देसाईगंज व आरमोरी तालुक्याचा समावेश होता. या दोन्ही तालुक्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला होता. विशेष म्हणजे विसोरा परिसरातील तीन उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये आपले नशीब अजमाविले होते.
केवळ एका उमेदवाराला ६० टक्क्यांवर मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:15 AM
पूर्वीच्या चिमूर आणि आताच्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात सन १९६७ पासून २०१९ पर्यंत १४ सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या एकूण १४ उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी ५० टक्केपेक्षा जास्त मते मिळविली.
ठळक मुद्देचिमूर व गडचिरोली-चिमूर मतदार संघ : १४ पैकी पाच उमेदवारांनी ५० टक्क्यांहून अधिक मते घेत जिंकला गड