आरमाेरी : सध्या स्पर्धेचे युग आहे. व्यक्तिमत्व विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या महाविद्यालयातून शिक्षण घेतल्याशिवाय स्पर्धेत टिकता येत नाही. आरमाेरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर पाेहाेचले आहेत. स्पर्धेच्या युगात अनेकांनी नावलाैकिक मिळवला आहे. हे महाविद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे माहेरघर आहे, असे प्रतिपादन रोजगार अधिकारी योगेंद्र शेंडे यांनी केले.
महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. यावेळी शेंडे बाेलत हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गाेंडवाना विद्यापीठाचे सहाय्यक प्राेग्रामर प्रमोद बोरकर, अजय सोनकर, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. मोहन रामटेके उपस्थित होते.
योगेंद्र शेंडे यांनी महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. गडचिरोली जिल्ह्यात रोजगार अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मे २०१८ मध्ये जांभुळखेडा येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सी-६० पथकाचे सैनिक शहीद किशोर यशवंत बोबाटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रमोद बोरकर, प्रा. प्रदीप चापले, प्रा. मतलाम, मेघा सालोरकर, ममता भोयर, राहुल रामटेके, प्रशांत दखने यांनी मनाेगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी उच्चशिक्षणाच्या बाबतीत महाविद्यालय प्रशासन गंभीर असून, अधिकाधिक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी महाविद्यालय तत्पर असल्याचे सांगितले. ऑनलाईन मेळाव्यात झुम ॲपद्वारे ५७, यू ट्यूबद्वारे १९४ तर फेसबुकद्वारे ३४ माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रा. मोहन रामटेके यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. विजय रैवतकर, प्रा. सुनील चुटे, किशोर कुथे, सचिन ठाकरे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.