जि.प. उपाध्यक्षांची अहेरी गटसाधन केंद्राला आकस्मिक भेट लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी बुधवारी गटसाधनकेंद्र अहेरी येथील कार्यालयाला सकाळी १०.४५ वाजता अचानक भेट दिली असता गटसमन्वयक टी. एस. राऊत व आयडीच्या कर्मचारी डी. वाय. पाटील हे दोनच कर्मचारी उपस्थितीत होते. चार कर्मचारी कार्यालयीन कामाने बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. उर्वरीत दहा कर्मचारी हे कार्यालयात उशिरा आलेत. लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिले आहेत. गटसाधन केंद्रांतर्गत तालुकाभरातील संपूर्ण शिक्षण विभागाच्या कार्यावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र या कार्यालयातील कर्मचारी उशीरा येत असल्याची तक्रार जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी गटसाधन केंद्राला बुधवारी १०.४५ वाजता आकस्मिक भेट दिली असता, तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून आलेत. कार्यालयीन वेळेत कर्मचारी उपस्थित नसल्याने लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश विभाग प्रमुख गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य व संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर यांना दिले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. कर्मचारी कार्यालयात उशिरा आलेत हे खरे आहे. या अगोदर आपण कार्यलयीन वेळेत गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा विचारला आहे. आज उपाध्यक्ष यांच्या भेटीदरम्यान गैरहाजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करून तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला जाईल. - निर्मला वैद्य, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, अहेरी
१६ पैकी दोनच कर्मचारी वेळेवर उपस्थित
By admin | Published: May 18, 2017 1:46 AM