लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनेक दिवसांपासून वनकायद्याच्या अडचणीमुळे प्रलंबित असलेला येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याच्या महसूल व वनविभागाने संकुलाच्या बांधकामासाठी प्रस्तावित असलेली लांझेडा येथील ६.९६ हेक्टर वनजमीन जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.विविध सोयीसुविधांनी युक्त जिल्हा क्रीडा संकुल नसल्यामुळे आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याची क्रीडा प्रतिभा खुंटली होती. जिल्ह्याची निर्मिती होऊन ३६ वर्ष पूर्ण झाली तरी इतक्या वर्षात जिल्ह्याच्या मुख्यालयी सुसज्ज क्रीडा संकुलाची उभारणी होऊ शकली नाही. वनविभागाच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरही वनविभागाच्या ताब्यातील जागा मिळत नव्हती. ‘लोकमत’ने वारंवार लक्ष वेधून क्रीडा संकुलाची गरज प्रकर्षाने मांडली. अखेर आमदार डॉ.देवराव होळी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे हा विषय लावून धरला. त्यामुळे लांझेडा येथील ती जागा क्रीडा समितीच्या ताब्यात येऊन प्रत्यक्ष बांधकामासाठीची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.लांझेडातील सध्याच्या जिल्हा प्रेक्षागार मैदानाच्याच जागेवर हे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. अनेक वर्षांपासून त्याचा वापर खेळ किंवा इतर कार्यक्रमासाठी होत असला तरी ती जागा वनविभागाच्या झुडूपी जंगलाची आहे.अनेक वर्षापूर्वी तत्कालीन स्टेडियम कमिटीने त्या जागेचे सपाटीकरण, भिंतीचे कुंपन, बसण्यासाठी स्टेअर केजची निर्मिती, २ बोअरवेल, चौकीदाराची खोली आदी कामे केली होती. कालांतराने ती जागा वनखात्याची असल्याचे निदर्शनास आल्यावर वन संवर्धन कायद्याअंतर्गत त्या जागेच्या मागणीचा प्रस्ताव क्रीडा विभागाकडून १९९२ ते २००४ पर्यंत तीन वेळा पाठविण्यात आला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.८ मार्च २००६ रोजी पुन्हा उपवनसंरक्षकांना लांझेडातील वन जमिनीच्या (क्रीडा संकुल) जागेचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर वनविभागाने काढलेल्या वेगवेगळ्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली. वनविभागाच्या जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून दुप्पट जागा वनविभागाला देण्यात आली. पर्यायी वनीकरण व वनविभागाच्या नियमानुसार क्रीडा विभागाने १ कोटी २९ लाख ९९ हजार रुपये वनविभागाकडे भरले. मात्र वनविभागाकडून एकामागून एक त्रुटी काढल्या जात असल्याने जागा हस्तांतरणाची प्रक्रिया खोळंबली होती.कोरची-कुरखेडाचा प्रस्ताव प्रलंबितचगडचिरोलीतील जिल्हा क्रीडा संकुलाप्रमाणेच कोरची आणि कुरखेडा येथील तालुका क्रीडा संकुलासाठीही वनविभागाकडे जागेची मागणी करण्यात आली आहे. मात्र वनविभागाकडून त्या जागांसाठी अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी तेथील खेळाडूंची कुचंबना होत आहे. यासोबतच धानोरा, एटापल्ली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या कामांसाठी प्रक्रिया अधिक गतीमान करण्याची अपेक्षा खेळाडूंकडून व्यक्त होत आहे. एटापल्लीतील काम निधीअभावी खोळंबले आहे.
जिल्हा क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:26 PM
अनेक दिवसांपासून वनकायद्याच्या अडचणीमुळे प्रलंबित असलेला येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याच्या महसूल व वनविभागाने संकुलाच्या बांधकामासाठी प्रस्तावित असलेली लांझेडा येथील ६.९६ हेक्टर वनजमीन जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.
ठळक मुद्दे६.९६ हेक्टर वनजमीन वळती : जिल्ह्यातील खेळाडूंच्या कौशल्याला मिळणार चालना