गडचिराेली : घराेघरी वीज पुरविणाऱ्या महावितरणच्या कार्यालयांमध्ये विद्युत फिटिंगची कशी स्थिती आहे, याबाबत ‘लाेकमत’ने मंगळवारी जिल्हाभरातील महावितरणच्या कार्यालयांमध्ये रिॲलिटी चेक केले असता, अनेक कार्यालयांमध्ये विद्युत फिटिंग व्यवस्थित नसल्याचे दिसून आले, तसेच काही वायर उघडे असल्याचे दिसून आले.
भंडारा येथील रुग्णालयांमध्ये १० चिमुकल्या बालकांचा मृत्यू झाला. ही घटना शाॅर्टसर्किटमुळे घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे राज्य शासन जागरूक हाेऊन राज्यभरातील सर्वच रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
शासकीय कार्यालयांसह प्रत्येक घराचे विजेचे बल्ब महावितरणच्या विजेने प्रकाशित हाेतात. महावितरणकडे शेकडाे अभियंते व विजेशी संबंधित ज्ञान असलेले हजाराे कर्मचारी आहेत. त्यामुळे महावितरणचे कार्यालय वीज सुरक्षेच्या बाबतीत सामान्य जनतेला आर्दश वाटेल, असे असणे अपेक्षित आहे. मात्र, दस्तुरखुद्द महावितरणच्या कार्यालयांमध्येच दुरवस्था असल्याचे ‘लाेकमत’च्या पाहणीत दिसून आले आहे. बहुतांश ऑफिसमध्ये विद्युत फिटिंग पूर्ण न करता अर्धवट आहे. काही ठिकाणचे पाइप फुटले आहेत, तसेच आवश्यक असलेल्या ठिकाणी उघड्या तारांनी वीजपुरवठा करण्यात आला आहे. याठिकाणी स्पार्किंगची दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्यालयांची स्थिती लक्षात घेतली, तर मागील अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक ऑडिट झाले नसल्याचे दिसून येते.
बाॅक्स
देसाईगंज येथील विद्युत विभागाचे कार्यालय आरमाेरी मार्गावर आहे. ज्या इमारतीतून विद्युत विभागाचा कारभार चालतो ती इमारत अतिशय जुनी व जीर्ण आहे. इमारतीच्या आतमध्ये वीजजाेडणी झाली नाही. अभियंत्यांना बसण्याची व्यवस्थासुद्धा व्यवस्थित नाही. काही ठिकाणी विद्युत फिटिंग नसल्याने उघडे वायर जाेडून काम चालविले जात आहे.
बाॅक्स
काेरची येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र आहे. या उपकेंद्राची इमारत जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात छतावरून पाणी गळते. त्यामुळे भिंतीला ओलावा येत असून, करंट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाइन फिटिंगचे पाइप फुटले आहेत. वायर जाेडून काम चालविले जात आहे. शाॅर्टसर्किट हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
धानाेरा येथील विद्युत विभागाचे कार्यालय पूर्वी भाड्याच्या खाेलीत हाेते. सहा महिन्यांपासून ते आता विद्युत विभागाच्या कर्मचारी क्वाॅर्टरमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी वीज फिटिंग सुस्थितीत आहे. मात्र, मीटर असलेल्या ठिकाणी वायर उघडेच असल्याचे आढळून आले. वीज मीटर जुने असून वीज मीटर लावण्यासाठी वापरलेल्या लाकडी फळ्या जीर्ण झाले आहेत. स्वीच बाेर्ड नव्याने लावण्यात आले आहेत.