उपविभागीय पोलीस आधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस दादालोरा खिडकी व जॉब कार्ड कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या सहकार्याने मदत केंद्राच्या हद्दीतील ३७ शेतकऱ्यांना धान बियाणे ५० टक्के अनुदानावर वितरित करण्यात आले. याशिवाय ३४ लोकांचे जॉबकार्ड, ९६ लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड तयार करून वाटप करण्यात आले. ३८७ नवीन कार्ड तयार करण्यात आले. दरम्यान, जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक, पेन व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. बिरसा मुंडा शासकीय प्रोत्साहन योजनेंतर्गत मदत केंद्राच्या हद्दीतील सरपंच, रोजगार सेवक, समाज सेवक यांना बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाला चामोर्शीचे पोलीस निरीक्षक विपिन शेवाळे, घोट पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप रोंडे, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा, रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राजेंद्र शेंडे, ग्रामसेवक प्रकाश सलामे, तलाठी साईनाथ कुलेटी, प्रशांत शाहा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पोलीस अंमलदार संभाजी सावंत, तर आभार मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पीएसआय नंदकुमार शिम्ब्रे यांनी मानले. कार्यक्रमाला रेगडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.