लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांसह विद्यमान सरकारच्या विरोध करण्यालायक एकही मुद्दा सापडत नसल्याने सरकारच्या कल्याणकारी योजनांचाच विरोध करण्यास सुरूवात केली आहे. नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विरोधकांनी काळा दिवस पाळला. यावरून त्यांच्या नकारात्मक प्रवृत्तीचे दर्शन होते, अशी टीका खासदार अशोक नेते यांनी केली.भाजपच्या वतीने ९ नोव्हेंबर रोजी काळा पैसा विरोधी दिनाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त इंदिरा गांधी चौकात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान ते मार्गदर्शन करीत होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जि.प. कृषी सभापती नाना नाकाडे, न.प. सभापती आनंद श्रृंगारपवार, अॅड. नितीन उंदीरवाडे, गुलाब मडावी, जि.प. सदस्य रंजिता कोडापे, नगरसेवक रंजना गेडाम, प्रविण वाघरे, अल्का पोहणकर, भुपेश कुळमेथे, रितू कोलते, वर्षा बट्टे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, प्राचार्य डी. के. मेश्राम, प्रशांत भृगुवार, श्रीकृष्ण कावनपुरे, अविनाश विश्रोजवार, प्रकाश अर्जुनवार, जनार्धन साखरे, दामोधर अरगेला, दत्तू माकडे, जावेद अली आदी उपस्थित होते. पुढे बोलताना, खासदार अशोक नेते म्हणाले, काँग्रेस विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अमाप काळा पैसा जमा केला. नोटबंदी होताच काळा पैसेवाल्यांचे धाबे दणाणले. काळा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा झाला असून यातून शासनाने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षांत विकासाला फार मोठी गती मिळाली आहे, असे प्रतिपादन केले.जिल्हा परिषद सदस्य योगीता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी यांनी देशाची आंतरराष्टÑीय स्तरावर पत वाढविली आहे. जे काम ७० वर्षांत झाले नाही, ते काम दोन वर्षांत होत असताना बघून काँग्रेस व विरोधी पक्षांचे पोट दुखत आहे. त्यामुळे देशाचा किंवा जनकल्याणाचा विचार न करता केवळ विरोधासाठी विरोध करण्याचे काम काँग्रेसने सुरू केले असल्याची टीका केली.कार्यक्रमाप्रसंगी प्रकाश अर्जुनवार, प्रशांत वाघरे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन भारत खटी तर आभार माजी उपशिक्षणाधिकारी राजनहिरे यांनी केले. यशस्वीतेसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.इंदिरा गांधी चौकातून निघाली रॅलीसभेच्या पूर्वी इंदिरा गांधी चौक-राम मंदिर-आरमोरी बसथांबा ते इंदिरा चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत खासदार, जि.प. अध्यक्ष यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी काळ्या पैशाच्या विरोधात तसेच भाजपा सरकारच्या वतीने राबविण्यात येणाºया विविध योजनांचे समर्थन करीत घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर इंदिरा गांधी चौकात रॅलीचा समारोप करून सभेत रूपांतर करण्यात आले.
विरोधकांकडे मुद्दे नसल्याने कल्याणकारी योजनांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:09 AM
काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांसह विद्यमान सरकारच्या विरोध करण्यालायक एकही मुद्दा सापडत नसल्याने सरकारच्या कल्याणकारी योजनांचाच विरोध करण्यास सुरूवात केली आहे.
ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : भाजपने पाळला काळा पैसाविरोधी दिन