गडचिरोली : ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ असा नारा देत उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांनी ज्या पद्धतीने ४० टक्के मुलींना तिकीट देण्याचा निर्णय घेतला, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही युवतींना संधी मिळू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात जास्तीत जास्त युवा वर्गाला काँग्रेस विचारधारेशी जुळवून सदस्यता नोंदणी वाढविण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. देशाला पहिली महिला पंतप्रधान, पहिली महिला राष्ट्रपती काँग्रेसनेच दिली आहे. त्यामुळे भविष्यातही काँग्रेसमध्ये महिलांचा योग्य सन्मान राखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर यादरम्यान काँग्रेस पक्षाची सदस्यता नोंदणी सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ३० हजार झाले आहे. याशिवाय युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदासाठीही निवडणूक होत असून त्याची तयारी सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. महाविद्यालयीन स्तरावर एनएसयुआय या विद्यार्थ्यांच्या संघटनेलाही कार्यशील बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव डॉ. नामदेव उसेंडी, पंकज गुड्डेवार, जिल्हा समन्वयक हसन गिलानी, युकाँचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
कंगनाने केला पद्मश्रीचा अपमान
ज्या ऐतिहासिक चित्रपटाने कंगनाला पद्मश्रीसारखा बहुमान मिळवून दिला, त्याच इतिहासातील स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या योगदानावर कंगना रणौतने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हा स्वातंत्र्यलढ्यातील सर्वच महान लोकांचा अपमान आहे. अशा व्यक्तीमुळे त्या पुरस्काराचाही अपमान होतो. त्यामुळे तिच्याकडून तो पुरस्कार परत घ्यावा आणि त्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवानी वडेट्टीवार यांनी केली.