खासदारकी सांभाळून संघटनेवर पकड : २०१४ पासून यशाची परंपरा कायमगडचिरोली : भारतीय जनता पक्षाला २०१४ पासून गडचिरोली जिल्ह्यात सतत निर्विवाद यश मिळत असल्याने खासदार पदासह जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणाऱ्या खासदार अशोक नेते यांचे राजकीय वजन वाढले आहे व त्यांचे पक्षांतर्गत विरोधकही स्तब्ध झाले आहेत.अलिकडेच जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी खासदार नेते यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या रणनितीला यश आल्याने भारतीय जनता पक्षाचे पारडे सध्या जड आहे. किसन नागदेवे यांची जिल्हाध्यक्ष पदाची मुदत भरल्यानंतर अशोक नेते यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद आले. त्यावेळी या पदावर अनेक ओबीसी समाजाचे दावेदार होते. मात्र अशोक नेते यांच्याकडे ही धूरा देण्यात आली. अशोक नेते खासदार असल्याने या पदाला न्याय देऊ शकणार नाही व पक्षाला अपयश आल्यास खासदार नेते आपोआपच राजकारणात फेल ठरतील. हा नेते विरोधकांचा मनसुबा सध्या तरी धुळीस मिळाला आहे. अशोक नेते यांच्या नेतृत्वात नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या जागा वाढल्या. त्यानंतर गेल्या वर्षात पार पडलेल्या दोन नगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपला निर्विवाद यश मिळाले. अशोक नेते पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून भाजपमध्ये इनकमींग मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षातून आलेल्यांनाही उमेदवाऱ्या वाटण्यात आल्या. वेळप्रसंगी पक्षातील जुने लोक नाराज झाले तरी त्याची पर्वा करण्यात आली नाही. या साऱ्यामुळे भाजपचा ग्राफ शहरी व ग्रामीण भागात समप्रमाण वाढल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेतही भाजप क्रमांक एकचा पक्ष झाला. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष जि.प.मध्ये विराजमान झाला. जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमतापासून दूर राहावे लागले. याला अहेरी विधानसभा क्षेत्रातले मिळालेल अल्प यश कारणीभूत असल्याचे कारण आता दिले जात आहे. एकूणच खासदार अशोक नेते यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेत सत्ता बसविण्यासाठी आविसंची घेण्यात आलेली मदत त्यासाठी पक्षाच्या राज्यस्तरावरील नेत्यांवर टाकलेला विश्वास या साऱ्या बाबी त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ठरल्या. त्यामुळे सध्या खासदार विरोधक हतबल असल्याचे दिसून येत आहे. खासदारांना शह देण्याची त्यांच्या विरोधकांची खेळी कुठेही यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
भाजप जिल्हाध्यक्षांच्या यशाने पक्षांतर्गत विरोधकही स्तब्ध
By admin | Published: March 24, 2017 1:04 AM