आंदोलनाचा दिला इशारा : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदनआरमोरी : तालुक्यातील पाथरगोटा, सालमारा, भगवानपूर, सावलखेडा, विहीरगाव या परिसरातील जंगलतोडीला वन विकास महामंडळाने सुरू केली आहे. या कामाला स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केला असून जंगल कटाई बंद करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. पाथरगोटा, सालमारा, भगवानपूर परिसरात मोहफूल, बेहडा, हिरडा, चार, तेंदू आदींची झाडे आहेत. या झाडांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना सहा महिन्यांचा रोजगार प्राप्त होतो. मात्र वन विकास महामंडळाने कुपकटाईच्या नावावर या झाडांची तोड सुरू केली आहे. आजपर्यंत हजारो झाडे तोडण्यात आली आहे. या ठिकाणी नवीन झाडे लावू, असे आश्वासन वन विकास महामंडळ घेत असला तरी पुढचे १० वर्ष या जंगलातून स्थानिक नागरिकांना कोणताच रोजगार उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे वन विकास महामंडळाने तत्काळ जंगलतोड बंद करावी, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. यावेळी दिलीप घोडाम, दीपक दुपारे, आकाश कांबळे, सादीक शेख, संदीप घोडाम, गोविंदा पुराम, टिकाराम मडावी, नरेंद्र डोंगे, मित्रा फुकटे, निलकंठ गोहणे, गणेश लाकडे, विलास सडमाके उपस्थित होते.
जंगल कटाईला गावकऱ्यांचा विरोध
By admin | Published: February 08, 2016 1:33 AM