वनमंत्र्यांनी घेतली दखल : कृष्णा गजबे यांची पत्रपरिषदेत माहिती लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : कोंढाळा, रवी, कासवी परिसरात गेल्या महिनाभरापूर्वीपासून धुमाकूळ घालून दहशत माजविणाऱ्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करून त्याचे इतरत्र स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडे रेटून धरली. सदर मागणीची दखल घेऊन वनमंत्र्यांनी वाघाला जेरबंद करण्याचे आदेश २६ मे रोजी दिले आहेत, अशी माहिती आ. कृष्णा गजबे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, कोंढाळा, परिसरातील जंगल व शेतशिवारात नरभक्षक वाघाने आजपर्यंत दोन इसमाला ठार केले. या परिसरात वाघाचा वावर असल्याने परिसरातील नागरिक वाघाच्या दहशतीत आहेत. सदर नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आपण वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती, असे आ. गजबे यांनी सांगितले. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे २६ मे रोजी गडचिरोली येथे आले असता, त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वाघाला जेरबंद करण्याची मागणी आपण त्यांच्याकडे रेटून धरली. या मागणीची दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी नरभक्षक वाघाला गुंगेचे औषध देऊन त्याला जेरबंद करण्यात यावे, असे आदेश त्यांनी काढले आहे. त्यानुसार वनाधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत, असे आ. गजबे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भाजपचे पदाधिकारी नंदू पेटेवार, सदानंद कुथे, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, गोपाल भांडेकर, अमर बोबाटे, राजू कंकटवार, स्वप्नील धात्रक, गोलू वाघरे, युगल सामृतवार आदी उपस्थित होते.
वाघाला जेरबंद करण्याचे आदेश
By admin | Published: May 28, 2017 1:10 AM