पांचाळ समाज समितीचा पाठिंबा
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या महामाेर्चाला पांचाळ समाज समितीने पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे तसेच प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी पांचाळ समाज समितीच्या सभेत करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अविनाश वरगंटीवार हाेते. यावेळी अविनाश विश्राेजवार, राकेश राचमलवार, बंडू उमरगुंडावार, काेमेश कत्राेजवार, किशाेर कमलापूरवार, नीलेश वटेलवार, अविनाश कत्राेजवार, प्रफुल विरगमवार, विजय कंटीवार, प्रवीण यज्ञूरवार, तुकाराम दडगेलवार तसेच पांचाळ समाजातील नागरिक उपस्थित हाेते. या माेर्चात ओबीसी बांधवांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
खा. बाळू धानाेरकर माेर्चात सहभागी हाेणार
गडचिराेली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांवर मागील अनेक वर्षांपासून सातत्याने अन्याय होत आहे. या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी जिल्ह्यातील ओबीसी समाज संघटनांच्या वतीने २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला जाणार आहे. या महामाेर्चात आपण सहपरिवार सहभागी होणार आहाेत, अशी माहिती खा. बाळू धानोरकर व आ. प्रतिभा धानोरकर यांनी दिली.
राज्यात ओबीसीचे आरक्षण १९ टक्के असले तरी काही जिल्ह्यांमध्ये ओबीसीचे आरक्षण कमी करण्यात आले आहे. यात सर्वाधिक कमी आरक्षण गडचिरोली जिल्ह्यात आहे. हे आरक्षण पूर्ववत करण्याकरिता मागील दोन दशकापासून येथील ओबीसी बांधव लढा देत आहेत. तरी शासनस्तरावरून ओबीसीचे आरक्षण अजूनपर्यंत पूर्ववत करण्यात आले नाही. त्यामुळे शासकीय-निमशासकीय कार्यालयात पदभरती करताना ओबीसी लोकांना मोठा फटका बसत आहे. हा अन्याय आपण खपवून घेणार नाही, असे खा. बाळू धानोरकर व आ. प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे व जातनिहाय जनगणना करावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी बांधवांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खा. बाळू धानोरकर यांनी केले आहे.
युवा कंत्राटरदार संघटनेचे समर्थन
२२ फेब्रुवारी राेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या महामोर्चाला जिल्हा युवा कंत्राटदार संघटने पाठिंबा दर्शविला आहे. ओबीसी मोर्चात सर्व कंत्राटदारबांधव उपस्थित राहणार आहेत. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून मोर्चातील लाेकांसाठी पिण्याच्या पाण्याचे स्टॉल लावणार आहेत, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा
विविध मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या ओबीसींच्या महामाेर्चाला अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भात ओबीसी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, प्रदेश सचिव राजन बोरकर, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदीरवाडे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपुरे उपस्थित हाेते. समर्थनपत्र स्वीकारताना ओबीसी संघटनेचे एस.टी. विधाते, महेंद्र ब्राम्हणवाडे, सतीश विधाते, नंदू वाईलकर, घनश्याम मुर्वतकर, बाळासाहेब आखाडे, गौरव येनप्रेडीवार, विनोद धंदरे, दिलीप चौधरी, वसंता राऊत उपस्थित होते.