आमच्याच लोकांनी आमचा ‘गेम’ केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 11:32 PM2018-11-03T23:32:12+5:302018-11-03T23:32:55+5:30
२०१४ च्या निवडणुकांमध्ये नागरिकांपेक्षा आमच्याच लोकांनी आमचा ‘गेम’ केला आणि आम्हाला हार पत्करावी लागली. पण २०१९ च्या निवडणुकांमध्ये तरी काँग्रेसजनांनी चूक सुधारून आपल्या निष्ठेला तडा जाऊ देऊ नये.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१४ च्या निवडणुकांमध्ये नागरिकांपेक्षा आमच्याच लोकांनी आमचा ‘गेम’ केला आणि आम्हाला हार पत्करावी लागली. पण २०१९ च्या निवडणुकांमध्ये तरी काँग्रेसजनांनी चूक सुधारून आपल्या निष्ठेला तडा जाऊ देऊ नये. चांगले स्वप्न पाहा. हातात हात घालून लढल्यास आपले स्वप्न नक्कीच पूर्ण होतील, असा विश्वास माजी शिक्षणमंत्री तथा विधानसभेचे माजी उपसभापती प्रा.वसंत पुरके यांनी व्यक्त केला. युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या वतीने माजी राज्यमंत्री तथा माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित स्रेहमिलन व सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी मंचावर काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्टÑीय अध्यक्ष व माजी मंत्री नितीन राऊत, आ.सुनील केदार, प्रदेश काँग्रेसचे महासचिव सुरेश भोयर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.अविनाश वारजुरकर, माजी आ.देवराव भांडेकर, काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश सचिव रविंद्र दरेकर, माजी प्रदेश सचिव सगुणा तलांडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश ईटनकर, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान, नरेंद्र जिचकार, हसनअली गिलानी, नगरसेवक सतीश विधाते, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री, जि.प.सदस्य जगन्नाथ बोरकुटे, युवक काँग्रेसचे पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राह्मणवाडे आदी अनेक जण मंचावर विराजमान होते.
यावेळी बोलताना प्रा.पुरके म्हणाले, काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर काही सत्तानिष्ठ नेतृत्वाचा जीव गुदमरायला लागला. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षाशी सलगी केली. पक्ष सत्ताधारी भाजपा तत्वनिष्ठ नाही. निव्वळ भुलथापा देऊन ते सत्तेवर आले. लोकशाही मुल्यांचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर २०१९ च्या निवडणुकीत सजग राहा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना उद्देशून केले.
माजी मंत्री नितीन राऊत यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारकडून शिष्यवृत्ती थांबवून आदिवासी, ओबीसींच्या शिक्षणात अडथळे आणले जात असल्याचा आरोप केला. आदिवासींना वनवासी संबोधले जात आहे. पण आम्ही मूळ निवासी आहोत हे ठासून सांगा, असे सांगत तिरंगा, संविधान मान्य नसलेल्या लोकांचे वारसदार तुम्हाला काय न्याय देणार? या खोटारड्या सरकारला हुसकावून लावा, असे आवाहन त्यांनी केले. माजी राज्यमंत्री, आ.सुनील केदार यांनी आक्रमक भाषणात सरकारला शेतकरी, बेरोजगारी, दलित-शोषितांच्या प्रश्नांपेक्षा राम मंदिर जास्त महत्वाचे वाटत असल्याचे सांगत सत्ताधाºयांची विरोध नाही तर विरोधकच संपवण्याची मानसिकता असल्याचे सांगितले.
यावेळी सत्कारमूर्ती मारोतराव कोवासे यांनी जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विपरित असली तरी सर्व लोकांना घेऊन जिल्हा सुजलाम, सुफलाम करण्याचा आपला प्रयत्न राहिला. त्यासाठी बंधारे बांधले. पण अजून बरेच काम करायचे आहे. लोकांना अंगठेबहाद्दर ठेवून आपल्या मागे फिरवण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारमधील लोकप्रतिनिधी करत आहेत. त्यावेळी आपण घरोघरी जाऊन जिल्हा काँग्रेसमय केला. आता पुन्हा एकदा जिल्हा काँग्रेसमय करण्यासाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कोवासे यांच्यासह नितीन राऊत, प्रा.वसंत पुरके, सुनील केदार, डॉ.नामदेव उसेंडी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मुरखळा (नवेगाव) येथील साईनाथ अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन फुलझेले यांनी तर आभार प्रदर्शन विश्वजित कोवासे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य संतोष संगनवार यांनी केले. या कार्यक्रमाला माजी खासदार आणि काँग्रेसच्या शेतकरी-शेतमजूर सेलचे अध्यक्ष नाना पटोले दिल्लीत असल्यामुळे अनुपस्थित होते. मात्र त्यांनी शुभेच्छा संदेश पाठविला. आ.विजय वडेट्टीवार यांचीही अनुपस्थिती होती.
आता कुणाकुणाची सर्जरी करणार?
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांना उद्देशून नितीन राऊत यांनी चांगलीच कोटी केली. तुम्ही डॉक्टर म्हणून अनेकांची सर्जरी केली असेल, पण आता जिल्हाध्यक्षपदाची सूत्र सांभाळताना कुणाकुणाची सर्जरी करणार हेच पहायचे आहे, असे आपल्या भाषणात म्हटले तेव्हा हास्याचे कारंजे उडाले.
कोवासेंवर उधळली स्तुतीसुमने
या कार्यक्रमात सर्व वर्क्त्यांनी मारोतराव कोवासे यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना त्यांनी या जिल्ह्याच्या विकासात दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीपासून तर गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूरमध्ये नाही तर गडचिरोलीतच असावे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सांगितले. मितभाषी आणि निष्कलंक व्यक्तिमत्व असलेले मारोतराव ‘टायर्ड’ झाले असतील पण ‘रिटायर्ड’ नाही, असे डॉ.उसेंडी म्हणाले.