नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधात वाढ करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेकडून यंदा प्रायोगिक तत्त्वावर ‘आमची शाळा आदर्श शाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची संकल्पना जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची आहे.या उपक्रमात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०४८ शाळांचा समावेश असणार आहे. या उपक्रमासाठी १०० गुण देण्यात आले आहेत. त्यातील ५८ गुण हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पडताळणीवर तर ४२ गुण हे शाळेच्या भौतिक सोयी सुविधेवर देण्यात आले आहे. या उपक्रमातील प्रत्येक शाळा दर महिन्याच्या ५ तारखेला स्वत:च्या शाळेचे स्वयंमूल्यांकन करून दिलेल्या प्रश्नांची माहिती भरणार आहे. ज्या शाळांना सर्वाधिक गुण मिळतील अशा शाळांचे फेरमूल्यांकन जिल्हा परिषदतर्फे राहणारी समिती करणार आहे.यंदाच्या सत्रासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जर या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढील वर्षीही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेला पुरस्कार देण्याचाही निर्णय विचाराधिन आहे. शाळेत भौतिक सुविधा असणे आवश्यकच आहे. याकडे लक्ष देण्याबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे काम सुरू आहे. शालेय इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे काय, शाळेमध्ये मिटरसह विद्युतीकरण केले असून विद्युत पुरवठा सुरु आहे काय, सर्व वर्ग खोल्यांमध्ये विद्युत व पंखे सुरू आहेत काय, शाळेतील सर्व वर्ग खोल्यांचे रंगकाम केले असून शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी बोलक्या भिती, आवश्यक शैक्षणिक तक्ते, तरंग चित्रे इत्यादींचा समावेश केला आहे काय, विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात बस्कर पट्या, डेस्कबेंच उपलब्ध आहेत काय, स्वच्छ व निर्जंतूक पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येते काय, शाळा डिजीटल आहे काय, शालेय परसबाग व बाग स्थायी स्वरुपात उपलब्ध आहे काय, यावर मुल्यांकण केले जाणार आहे.मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे काय, स्वच्छतागृहामध्ये कमोड टॉयलेट, हॅन्ड्रील्स, कमोड चेअरची सुविधा आहे काय, स्वयंपाकगृहात अन्य धान्य साठवणूक व वस्तूवरील नामनिर्देशन सुव्यवस्थित केले का, पोषण आहार शिजवितांना पूर्णपणे स्वच्छता राखली जाते का, उरलेल्या निरुपयोगी अन्नाची योग्य विल्हेवाट करण्यात येते का, पोषण आहार शासनाच्या निकषानुसार देण्यात येत असून त्यासंबंधी नोंदी ठेवण्यात येतात का, शासन निकषानुसार स्वयंपाकगृहात शालेय पोषण आहार तक्ता (मेनू) लावण्यात आला का, शाळेतील ग्रंथालयात किमान २०० पुस्तके असावेत.पुस्तकांचे विषयनिहाय वर्गीकरण करुन पुस्तकाची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात आली का, ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग विद्यार्थी करतात का, शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग नोंदविला असून शिष्यवृत्तीसाठी ५० टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली का, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आहे का, नाविण्यपूर्ण उपक्रम घेण्यात येतात का, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, क्षेत्रभेट इत्यादीचे आयोजन करण्यात येते का, शासकीय उपक्रमांना अनुसरुन गावपातळीवर शाळेद्वारे प्रभातफेरी, समाजउपयोगी कार्यक्रम घेण्यात का, त्याच्या नोंदी फोटोसह ठेवण्यात येतात काय अशा विविध मुद्यांवर मूल्यांकन केले जाणार आहे.विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक स्वच्छतेवर भरविद्यार्थ्याचे गणवेश स्वच्छ व निटनेटके आहे काय, विद्यार्थ्यांची वैयक्तिक तपासणी केली जाते काय (आठवड्यातून एकदा-दोनदा), लोकसहभागाकडे नजर टाकताना शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा घेण्यात येते काय, चालू शैक्षणिक सत्रात लोकवर्गणी समाजाकडून रोख, वस्तू रुपाने घेण्यात आली काय, माजी विद्यार्थी संघ शाळेत स्थापन करण्यात आले काय,माजी विद्यार्थी संघातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत काय यावरही गुण दिले आहेत.भरावी लागेल ‘मोबाईल अॅप’ वर माहितीशिक्षकांना विविध कामे असल्यामुळे त्याच्यावर या उपक्रमाची माहिती देण्याचे अधिक काम होऊ नये यासाठी मोबाईल अॅप तयार करण्यात येत आहे. या मोबाईल अॅपच्या माध्यमातून शाळांकडून माहिती भरवून घेण्यात येणार आहे.यामुळे कोणत्याही शाळा कागदोपत्री गुंतणार नाहीत.
जि.प.राबविणार ‘आमची शाळा आदर्श शाळा’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:49 AM
जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधात वाढ करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेकडून यंदा प्रायोगिक तत्त्वावर ‘आमची शाळा आदर्श शाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
ठळक मुद्देराजा दयानिधी यांची संकल्पना : जिल्ह्यातील १०४८ जि.प. शाळांचा सहभाग