शिक्षण विभागाची शोधमोहिम जोरात बाहेरगावच्या मुलांना नजीकच्या शाळेत केले दाखल गडचिरोली : राज्य शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात २६ डिसेंबर रोजी सोमवारला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान बाहेरगावातील एकूण २२ शाळाबाह्य मुले गडचिरोली जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. यापैकी अर्ध्या अधिक मुलांना नजीकच्या प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. शिक्षण विभागाच्या वतीने गडचिरोली शहरात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात आली. सोमवारी आठवडी बाजार परिसरातील विसापूर मार्गावर बाहेरगावचे तीन शाळाबाह्य मुले आढळून आले. यामध्ये कोहीनूर आस्मीन सय्यद (७), मुन्नी आस्मीन सय्यद (६), अरूण अनिल मानकर (६) यांचा समावेश आहे. शोधमोहिमेदरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, गट शिक्षणाधिकारी उद्धव डांगे, न.प. शाळेच्या मुख्याध्यापिका काळे, शिक्षण विस्तार अधिकारी आर. पी. आकेवार, मधुकर दोनाडकर, जिल्हा समन्वयक भाऊराव हुकरे, विस्तार अधिकारी निखील कुमरे, विशेष तज्ज्ञ राजेश पचारे, संसाधन शिक्षक डुल्लीराम ब्राह्मणकर, अजितसिंह टाक, विस्तार अधिकारी संगीता खोब्रागडे आदी उपस्थित होते. गडचिरोली शहरात आढळलेल्या या तिन्ही मुला, मुलींना हनुमान वार्डातील राजीव गांधी न.प. प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. अहेरी तालुका मुख्यालयापासून आठ किमी अंतरावरील डिजीटल वर्ग असलेल्या मोदूमोडगू येथील जिल्हा परिषद प्राथामिक शाळेत एक मुलगा व एक मुलगी अशा दोन शाळाबाह्य बहिण-भावाला दाखल करण्यात आले. विषय साधन व्यक्ती सुषमा खराबे यांच्या पुढाकाराने सोमवारी अहेरी शहर परिसरात शाळाबाह्य विद्यार्थ्याची शोध मोहीम राबविण्यात आली. यात निखील जितेंद्र आत्राम (८) व सिमरन जितेंद्र आत्राम (७) दोघेही रा. मूल ही दोन शाळाबाह्य मुले आढळून आली. निखीलला तिसरीत व सिमरन हिला दुसऱ्या वर्गात शाळेत दाखल करण्यात आले. मुख्याध्यापक रमेश चांदेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन या दोन्ही बहिण-भावांचे स्वागत केले. तसेच शालेय गणवेश, पुस्तके व दप्तर देऊन त्यांना शाळेत दाखल करून घेतले. सदर दोन्ही मुले शाळेजवळ काही अंतरावर आपल्या कुटुंबासोबत तात्पुरती झोपडी करून राहत होते. मोहिमेसाठी शिक्षक गौतम यांच्यासह साधन व्यक्ती सुषमा खराबे व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. सदर शाळाबाह्य मुले शोधमोहीम २९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या दृष्टीने राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कार्यक्रम आखला आहे. रात्री उशीरापर्यंत आढळून आलेल्या शाळाबाह्य मुलाच्या संख्येची माहिती जि.प. शिक्षण विभागामार्फत संकलीत करण्यात येत होती. त्यामुळे काही तालुक्यातील शाळाबाह्य मुलांची संख्या मिळाली नाही.
२२ शाळाबाह्य मुले आढळली
By admin | Published: December 27, 2016 1:48 AM