ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अवैध दारू वाहतूक आणि साठा करणाऱ्यांवर मोठ्या कारवाया केल्या. मात्र दारूबंदीच्या या जिल्ह्यात दारूतस्करी करणारे खरे ‘म्होरके’ अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नसून त्यांच्याकडून दारूतस्करीचे काम सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांच्या त्या कारवाया केवळ दिखावा होत्या की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.गेल्या २९ नोव्हेंबर रोजी अहेरी तालुक्यातील मोसम गावाजवळ दोन वाहनांमधून येणाऱ्या हजारांवर दारूच्या पेट्या एलसीबीच्या पथकाने पकडल्या होत्या. त्या केवळ एक दिवसाच्या कारवाईत १ कोटी २८ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला होता. त्यावरून वर्षभरात किती रुपयांची दारू या दारूतस्कराकडून आणल्या जात असेल याचा अंदाज येतो.या प्रकरणातील मुख्य आरोपी चामोर्शी येथील आरोपी धर्मा रॉय अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र त्याचे दारूचे व्यवहार अजूनही बिनबोभाटपणे सुरू आहेत.विशेष म्हणजे हे प्रकरण ताजे असताना सदर आरोपी प्रकृती ठिक नसल्यामुळे उपचार घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मग वैद्यकीय उपचारानंतर पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून तो गायब झाला कसा? हा प्रश्न अनुत्तरित आहे.दुसऱ्या एका प्रकरणात डिसेंबर महिन्यात कोरची येथील दारू पुरवठादार निर्मल धमगाये याचा ४९ लाखांचा माल विशेष पथकाने पकडला होता; मात्र तोसुद्धा अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या दारू तस्करांचा शोध स्थानिक ठाण्याच्या पोलिसांसोबत विशेष पथकही घेते. तरीही कोणालाच त्याचा सुगावा लागू नये, हे पोलिसांचे अपयशच असल्याचे मानले जात आहे.कारवाईदरम्यान गाडीसोबत असलेल्या चालक आणि मदतनिसाला पकडायचे, पण खऱ्या म्होरक्यांना पुढील व्यवहारासाठी मोकळे राहू द्यायचे असे सूत्र वापरले जात असल्याचे बोलले जाते.चामोर्शी, कोरची आणि आरमोरी केंद्रप्राप्त माहितीनुसार, जिल्हाभरात अनधिकृतपणे दारूचा पुरवठा करण्यासाठी चामोर्शी, आष्टी, कोरची, आरमोरी तसेच चामोर्शी तालुक्यातील कुरूड हे प्रमुख केंद्र आहेत. याशिवाय जिल्ह्याच्या दक्षिण भागातही काही ठिकाणी दारू तस्करांचे मोठे केंद्र आहे. या ठिकाणी छत्तीसगड, तेलंगणासह मध्यप्रदेश व हरियाणातील दारू चोरट्या मार्गाने येते. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ चालतो. पण यातील अनेक केंद्र अजून कारवाईच्या टप्प्यात आलेले नाहीत. ज्या प्रमाणात दारूची वाहतूक करून साठा व विक्री केली जाते त्या प्रमाणात पोलिसांकडून झालेल्या कारवाया अगदीच नगण्य आहेत. यातून पोलीस ठाणेच नाही तर कारवाई करणारे पथकही मालामाल होत आहे.नक्षल सेलच्या अधिकाºयाकडे दारूबंदीचे काम का?काही दिवसांपूर्वी एलसीबीच्या पथकाचे नियंत्रण पाहणारे वरिष्ठ अधिकारी आणि पथकावर एका पूर्वाश्रमीच्या दारू विक्रेत्याने पत्रपरिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडीत यांची बदली नक्षल सेल (आॅपरेशन) मध्ये करण्यात आली. तर नक्षल सेलमधून अतिरिक्त पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांची बदली पंडीत यांच्याजागी करण्यात आली. मात्र दारूबंदीच्या कारवायांचे नियंत्रण अजूनही पंडीत यांच्याकडेच ठेवण्यात आले. नक्षल सेलसारखा महत्वाचा विभाग सांभाळताना त्यांच्याकडे दारूबंदीच्या कारवायांची जबाबदारी देण्याचा हेतू काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.झालेल्या कारवाया म्हणजे हिमनगाचे टोकदारूच्या व्यसनापासून नवीन पिढीला परावृत्त करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. मात्र ही दारूबंदी नावाचीच राहिली आहे. प्रत्यक्षात दिवसागणित दारू पुरवठा, विक्रीसह पिणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. ठिकठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यांना विश्वासात घेऊनच हे सर्व चालत असले तरी आता स्थानिक गुन्हे शाखेकडून केल्या जात असलेल्या कारवायांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहात आहे. प्रत्यक्षात झालेल्या कारवाया हे केवळ हिमनगाचे टोक असून प्रत्यक्षात दारूचे व्यवहार कितीतरी पटीने जास्त आहेत. असे असताना एखादी कारवाई दाखवून संबंधित तस्कराच्या पुढील व्यवहारांवर पांघरून घालायचे असा गोरखधंदा सुरू आहे.
कोट्यवधीच्या दारूतस्करीनंतरही बडे ‘म्होरके’ अटकेच्या बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:35 AM