कोविड-१९ च्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा वेळीच सावध झाली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारवाईत सातत्य नसल्याने नागरिकांचा सैराटपणा वाढला असून, तो अंगलट येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तालुक्यात परत एकदा कोरोनाचा उद्रेक होऊन लाॅकडाऊन लागण्यासाठी ते कारणीभूत ठरू शकते.
गेल्यावर्षी दि. २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन करण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे दि. १२ मे पर्यंत एकही कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. लाॅकडाऊन शिथिल करताच जिल्हा सीमांवरील चेकपोस्ट हटवण्यात आल्याने कोरोनाचा हाॅटस्पाट ठरलेल्या नागपूरवरून कोरोनाचे देसाईगंज शहरात आगमन होऊन दि. १२ मे रोजी पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. तथापि, महसूल विभाग, नगर प्रशासन विभाग, आरोग्य विभागाच्या चमूने बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे शहरासह तालुक्यात कोरोना आटोक्यात ठेवण्यात यश आले होते. आता मास्क अथवा रुमालाचा वापर न करणे, दुकानांत अथवा गर्दीच्या ठिकाणी शारीरिक दुरीकरणाचे नियम न पाळणे, कोरोना पाॅझिटिव्ह असतानाही सार्वजनिक ठिकाणी वावरणे, यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंगल कार्यालये, सांस्कृतिक हाॅल, आठवडी बाजार, गावागावांत होत असलेले सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, भरविण्यात येत असलेले आठवडी बाजार, शहरातील प्रसिद्ध कपडा माॅलमध्ये कोणतेही नियम न पाळता अनावश्यक गर्दी होत आहे. स्थानिक प्रशासनाच्या दिमतीला पोलिसांचे अपेक्षित सहकार्य लाभत नसल्याचे सांगण्यात येत आहे. ८० हजारांच्या घरात लोकसंख्या असलेल्या या तालुक्यात आतापर्यंत एक हजारच्या आतच नागरिकांनाच कोविड-१९ ची लस देण्यात आली. सामान्य नागरिकांना ही लस मिळण्यासाठी अजून बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत कोरोनाचा उद्रेक पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने कारवाईतील सातत्य कायम राखणे गरजेचे झाले आहे.