गडचिरोली : तापेने फणफणलेल्या दोन भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर वाहन उपलब्ध करुन न दिल्याने जन्मदात्यांना मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किलोमीटर पायपीट करावी लागल्याची घटना १२ दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे उघडकीस आली होती. याच परिसरातील शेजारच्या भामरागड तालुक्यातून १७ सप्टेंबरला संतापजनक घटना समोर आली. एका डॉक्टरला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यामुळे आरोग्य वर्तुळ हादरले आहे.
ब्रम्हानंद रैनू पुंगाटी (२९, रा. बारसेवाडा ता. एटापल्ली) असे त्या डॉक्टरचे नाव आहे. नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल पिपली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात तो कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. १५ सप्टेंबर रोजी पहाटे हालेवारा पोलिस मवेली - हालेवारा - पिपली बुर्गी या मार्गावर नाकाबंदी करत होते.
यावेळी (एमएच ३३ टी ४४७८) ही तेथून जात होती. रुग्णवाहिका असल्याने पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले, पण चालकाने गाडी सुसाट नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी पाठलाग करत रुग्णवाहिका थांबवून तपासणी केली असता आत देशी दारूचे १० बॉक्स व विदेशी दारूच्या ९६ , बाटल्या आढळल्या. डॉ . ब्रम्हानंद पुंगाटीसह शशिकांत शशिकांत बिरजा मडावी (३३ रा. एटापल्ली), सौरभ गजानन लेखामी ( २० रा. पिपली बुर्गी ), भिवाजी रैनू पदा (३१, रा. पिपली बुर्गी) यांना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेत दिलीप लालू लेखामी (रा. पिपली बुर्गी) हा पळून गेला. याप्रकरणी हालेवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून देशी - विदेशी ८८ हजार ६० रुपयांची दारू व रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे. उपनिरीक्षक अक्षय पाटील अधिक तपास करत आहेत.
दोन दिवसांची पोलिस कोठडी दरम्यान, चारही आरोपींना १६ रोजी एटापल्ली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.तात्काळ बडतर्फी पोलिसांच्या कारवाईनंतर जीला परिषद सीईओ आयुषी सिंह यांनी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्रम्हानंद पुंगाटी यास तडकाफडकी बडतर्फ केले आहे. यात सहभागी अन्य कर्मचारी रडारवर आहेत. त्यांच्यावरही कारवाई अटळ मानली जात आहे.