मंत्री सामंत यांच्या हस्ते विद्यापीठाच्या परिसरात मॉडेल कॉलेजचे भूमिपूजन तसेच डेटा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष व प्रशासन यांनी सांघिक भावनेतून काम केल्यास शैक्षणिक क्षेत्रात आपले राज्य देशात नंबर एकवर असेल. या कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी, कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल चिताडे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी ना. सामंत म्हणाले, विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहतील तसेच लोकशाही प्रक्रियेत लोकप्रतिनिधींची निवड अतिशय अभ्यासपूर्वक करतील, यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे सक्षम करणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षण प्रक्रियेत राजकारण न आणता एकत्र येऊन युवा पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणे तुम्हाआम्हा सर्वांचे लक्ष्य असले पाहिजे. राज्यात ३.५ लाख विद्यार्थ्यांनी कोरोना काळात परीक्षा दिल्या. पण, एकालाही कोरोनाची बाधा झाली नाही. तसेच उर्वरित ९७ टक्के विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा झाल्या. या सर्व परीक्षा राज्य शासनाने देशात आदर्शवत पार पाडल्या. यासाठी प्राध्यापक, विद्यार्थी, पोलीस तसेच महसूल विभागाचे अभिनंदन करायला हवे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ना. सामंत यांचा सत्कार कुलगुरू डॉ. वरखेडी यांनी केला. यावेळी सामंत यांच्या हस्ते विद्यापीठातील विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी आभार मानले. प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी सूत्रसंचालन केले.
(बॉक्स)
विज्ञान महाविद्यालयातील वसतिगृहाचे उद्घाटन
गडचिरोलीमधील चामोर्शी रस्त्यावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयातील मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन ना. उदय सामंत यांनी केले. या कार्यक्रमात विज्ञान कॉलेजला आवश्यक ५ एकर जमीन तातडीने उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजनमधून देण्यासाठी पालकमंत्र्यांना विनंती करू, असेही ते म्हणाले. प्राचार्य वानखेडे यांनी महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती दिली.