दिलीप दहेलकर
गडचिराेली : अस्वच्छता, घाण पाणी साचलेली डबकी, त्यात एडिस ईजिप्ती डासांची हाेणारी उत्पत्ती यामुळे पावसाळयात डेंग्यू आजाराची साथ अधिक पसरते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात याबाबत प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या आठ महिन्यांच्या कालावधीत गडचिराेली जिल्ह्यात ७०पेक्षा अधिक डेंग्यूबाधित रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे अहेरी व सिराेंचा तालुक्याच्या दुर्गम भागात डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या अधिक आढळली. त्यामुळे सदर दाेन तालुक्यांवर जिल्हा व तालुका आराेग्य यंत्रणेने लक्ष अधिक केंद्रित केले आहे.
चालू वर्षात ३० जुलैपर्यंत जिल्हाभरात एकुण ६७ रुग्ण डेंग्यूबाधित आढळून आले आहेत. मात्र या वर्षात डेंग्यूने एकाही बाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. असे असले तरी जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्यासह जिल्हा आराेग्य अधिकारी व आराेग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी अहेरी व सिराेंचा या दाेन्ही तालुक्यांच्या विविध संवेदनशील गावांना भेटी दिल्या. तेथील आराेग्याच्या बाबी व अडचणी जाणून घेतल्या. तसेच हिवताप व डेंग्यूबाबत अधिक सतर्क राहण्याच्या सूचना अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी दिल्या.
अशी घ्या काळजी
डेंग्यू हा किटकजन्य आजार असून तो विषाणूपासून पसरत असतो. डेंग्यू या आजाराचा प्रसार एडिस ईजिप्ती या डासापासून होत असतो. हा डास प्रामुख्याने दिवसा चावत असतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असते. त्यामुळे आपल्या घरातील कुंड्या, कूलर, रिकामे टायर, फ्रिजच्या मागे, घरावरील छतावर पाणी सात दिवसांपेक्षा जास्त पाणी साचणार नाही याबाबत सर्वानी दक्षता घ्यावी.
गावागावांत ताप सर्वेक्षण
आरोग्य विभागामार्फत डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी गावागावामध्ये ताप सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच किटकजन्य सर्वेक्षणामध्ये घरातील दूषित कंटेनर शोधून ते रिकामे केल्या जात आहे. तसेच तापच्या रुग्णावर वेळीच उपचार करून गंभीर आजाराच्या रुग्णांना वेळीच संदर्भ सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. पंचायत विभागामार्फत ग्रामपंचायतीद्वारा धूर फवारणी, पिण्याचे पाण्याचे निर्जंतुकीकरण केल्या जात आहे.
वेळोवेळी घेतला जातोय आढावा
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह या वेळोवेळी सर्व विभागाच्या विभाग प्रमुखाची व्ही. सी.द्वारा आढावा घेऊन पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्या याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. आरोग्य विभागासोबत इतर विभागांनी समन्वय साधून जिल्ह्यातील डेंग्यू मलेरिया या आजारावर नियंत्रणाकरिता प्रयत्न करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहे. नुकतेच त्यांनी सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मोयाबीनपेठा येथे भेट देऊन आरोग्य विषयक बाबीचा आढावा घेतला.
डेंग्यू आजाराची लक्षणे ...
एकाएकी ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, सर्वांग दुखणे, अंगावर पुरळ येणे, पोट दुखणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, प्रसंगी उलट्यातून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, नाकातोंडातून हिरड्यातून रक्तस्त्राव होणे, रक्त मिश्रित काळसर संडास होणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत.
तर... तातडीने गाठा रुग्णालय
डेंग्यूबाबतची लक्षणे आढळल्यास तत्काळनजीकच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत रक्ततपासणी करावी आणि औषधोपचार घ्यावे. तसेच आजाराला टाळण्याकरिता नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. दर आठवड्याला घरातील पाण्याची भांडी रिकामे करून स्वच्छ घासून, पुसून कोरडी करावी, जुने टायर, नारळाचे टरफल, प्लास्टिकच्या वस्तू, पाणी साचू शकेल अशा फुटलेल्या बाटल्या अशा निरोपयोगी वस्तू घराभोवती साठू देऊ नका, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.