अंगणवाडी महिलांची व्यथा : पेरमिली व भामरागड येथे झाला मेळावा पेरमिली/भामरागड : २०१३ पासून टीए बिल तसेच इंधन बिलाचे पैसे अंगणवाडी महिलांना मिळालेले नाही. १ एप्रिल २०१४ पासून मानधनात वाढ करण्यात आली. परंतु त्याची वर्षभराची थकबाकी अंगणवाडी महिलांना देण्यात आली नाही, अशी माहिती अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी दिली आहे. पेरमिली प्रकल्पातील अंगणवाडी महिलांची बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ललिता दहागावकर होत्या. याप्रसंगी प्रास्ताविक रेखा येनगंटीवार यांनी केले. आभार सखुबाई येनप्रेडीवार यांनी केले. भामरागड येथेही अंगणवाडी महिलांची बैठक सुनंदा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते. प्रास्ताविक संध्या रापर्तीवार यांनी केले. गेल्या पाच वर्षांपासून अतिरिक्त कार्यभाराचे पैसे कुणालाही देण्यात आले नाही. एप्रिल २०१४ पासूनचे मानधन दोन वर्ष होऊनही वितरित झाले नाही. वाढीव मानधनाची थकबाकी देण्यात आली नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रा. दहिवडे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून किमान वेतन १५ हजार रूपये मिळावे, अशी आपण मागणी करत आहो, मात्र सरकारने ती मान्य केलेली नाही. केंद्रीय बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा केली होती, तीही फसवी ठरली आहे, असा आरोपही दहिवडे यांनी केला. करूणा धुर्वा यांनी या बैठकीचे आभारप्रदर्शन केले. या मेळाव्याला उषा मेश्राम, पुष्पा गावडे, शकुंतला मडावी, विमल आत्राम, सुमन सुपावे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
वर्ष उलटूनही थकीत मानधनाचे वितरण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 1:25 AM