गडचिरोली : पुराच्या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासोबतच त्यांची सर्व व्यवस्था करा. अशा नैसर्गिक आपत्तीतही नागरिकांची सुरक्षितता, अन्नधान्याचा पुरवठा आणि आरोग्याच्या बाबतीत त्यांची गैरसोय होता कामा नये. धरणांमधून पाणी सोडताना विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी सर्व विभागांचा एकमेकांशी समन्वय ठेवा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीत आढावा बैठकीदरम्यान सर्व विभागप्रमुखांना केली.
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.११) अचानक गडचिरोलीचा दौरा काढून जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. पदारूढ झाल्यानंतर आमच्या दोघांचा हा पहिलाच अधिकृत शासकीय दौरा असून तो आम्ही गडचिरोलीतून सुरू केल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. गडचिरोलीत शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी लवकरच प्रक्रिया केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले. वनकायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची कार्यवाही करा, अशा प्रस्तावांची यादी आपल्याकडे सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
नागपूरमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर तयार असतानाही खराब हवामानामुळे रस्ते मार्गाने त्यांना गडचिरोली गाठावे लागले. संध्याकाळी ७.३० च्या सुमारास गडचिरोलीत पोहोचल्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली.
नेहमी संपर्क तुटणाऱ्या गावांचे होणार पुनर्वसनदुर्गम भागातील ज्या गावांचा दरवर्षी पावसाळ्यात संपर्क तुटतो त्या गावांचे दुसरीकडे पुनर्वसन करावे अशी सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवून त्यादृष्टिने विचार करण्याची सूचना प्रशासनाला केली.