लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्याचे पर्जन्यमान जास्त असल्याने जिल्हावासीयांना पाऊस नवीन नाही. मात्र गेल्या दोन दिवसात वरुणराजाने चांगलेच डोळे वटारल्याने सर्वांची दाणादाण झाली. भामरागड आणि चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. यासोबत इतरही तालुक्यांमध्ये रस्त्यांसोबत नुकत्याच रोवणी केलेल्या धानाचे पऱ्हे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. आधीच कर्जमाफीला आणि बँकांकडून कर्जवाटप करण्यास झालेल्या विलंबामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना आता या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. चामोर्शी : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चामोर्शी तालुक्यात तब्बल एका रात्री ५१९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे चामोर्शी - आष्टी मुख्य मार्ग बंद झाला आहे. तसेच तालुक्यातील सोनापूर येथील मामा तलावाची पाळ अविृष्टीमुळे फुटली. यामुळे चार ते पाच घरे पाण्यात वाहून गेली. तसेच २०० घरे व शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. तलाव फुटल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे या नागरिकांचे स्थलांतर चामोर्शी शहरात करण्यात आले आहे. चामोर्शी शहरातील शारदा राईस मिलजवळील तलावाची पाळ फुटल्याने चामोर्शी शहर पूर्णत: जलमय झाले आहे. अनेक घरात तलावाचे पाणी शिरले. गडचिरोली मार्गावरील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय परिसरात तीन ते चार फुट पाणी शिरल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. चामोर्शी माल येथील लिलाबाई शालिकराम ढवळे यांचे घर पावसामुळे पडले. येथीलच जानबा टेंभुर्णे यांच्या घराची मातीची भिंतही पडली. करपडा येथील देविदास धारणे यांचे घरही पावसामुळे रात्रीच्या सुमारास पडले. नुकसानग्रस्त घरांचा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून मौका पंचनामा करण्यात आला. मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे कुरखेडा तालुक्यातील पलसगड भागातील गरगळा येथून वाहणाऱ्या सती नदीला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पूर आला. गरगळा येथील शेतकरी मधुकर राजीराम पुराम यांच्या मालकीचा बैल पुरात वाहून गेला. त्यामुळे पुराम यांचे २० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. पावसाने संपूर्ण जिल्हा जलमय झाला असून जीवन प्रभावित झाले आहे.
अतिवृष्टीने दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 2:12 AM