लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक इंदिरा गांधी चाैकातील ट्रॅफिक सिग्नल सुरू झाल्यानंतर एसटीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी एकदम एसटीच्या समाेर आली. यात एसटीची दुचाकीला धडक बसून एका दुचाकीस्वाराच्या पायावरून एसटीचे चाक गेले. तर, मागे बसलेला दुचाकीस्वार किरकाेळ जखमी झाला. ही घटना साेमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
राकेश जीवन मारबते (२६), अनिकेत मुक्तेश्वर कलसार (२५ दाेघेही रा. गेवरा खुर्द ता. सावली) अशी जखमींची नावे आहेत. तर प्रेमदास चव्हाण असे बस चालकाचे नाव आहे. येथील आगाराची एमएच १४ बीटी ५००९ क्रमांकाची बस नागपूरला प्रवासी घेऊन जात हाेती. दरम्यान, इंदिरा गांधी चाैकात ट्रॅफिक सिग्नल बंद झाल्याने काही वेळ थांबली. ट्रॅफिक सिग्नल सुरू हाेताच आरमाेरीमार्गे नागपूरकडे जाण्यासाठी निघाली. दरम्यान, याच दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने एसटीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात दुचाकी एकदम एसटी बसच्या समाेर आली. यामुळे दुचाकीला एसटीची धडक बसली.
यात नियंत्रण सुटून दुचाकीस्वार राेडवर काेसळला. मात्र, एका दुचाकीस्वाराच्या पायावरून एसटीचे मागचे चाक गेले. त्यात ताे गंभीर जखमी झाला. तर, दुसरा किरकाेळ जखमी झाला. दुचाकी मात्र एसटीच्या मधाेमध सापडली. काही काळ चालकाच्या ही बाब लक्षात आली नाही. त्यामुळे दुचाकी बरेच दूर फरफटत गेली.