१५ दिवस उलटले : देलनवाडी व धानोराच्या केंद्रावर विक्रीसाठी आणलेले धान उघड्यावर पडून धानोरा/वैरागड : तालुका मुख्यालय असलेल्या धानोरा येथे आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात येत असलेली धान खरेदी गोदामात जागा शिल्लक राहिली नसल्याने मागील १५ दिवसांपासून बंद पडली आहे. हीच परिस्थिती आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरातील देलनवाडी धान खरेदी केंद्रांवर आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या नियोजन शून्यतेमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. धानोरा येथील केंद्रांवर धानाची आवक वाढल्याने गोदाम धानाने पूर्णत: भरले. आता धान साठवणुकीची व्यवस्था नसल्याने गेल्या १५ दिवसांपासून सदर केंद्रावर धान खरेदी बंद आहे. तसेच धानोरा परिसरातील ३० ते ३५ शेतकऱ्यांचे १८० क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर पडून आहे. मात्र याकडे आदिवासी विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. सदर धान खरेदी केंद्रावर यापूर्वी बारदाना उपलब्ध नसल्याने काही दिवस खरेदी बंद होते. शेतकऱ्यांनी स्वत: आपल्याकडील बारदाना खरेदी केंद्राला द्यावे, असे आदेश महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढले. प्रतिबारदाना १५ रूपये शेतकऱ्यांना दिले जाते, असेही आदेशात म्हटले आहे. धानाची खरेदी वाढल्यास संस्थेची पतमर्यादा संपणार, तसेच धान चुकाऱ्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यास विलंब होईल, याची शक्यता नाकारता येत नाही. धानोरा तालुक्यात आणखी अनेक केंद्र अद्यापही सुरू झाले नाही. त्यामुळे २० किमीचे अंतर कापून शेतकरी या केंद्रावर विक्रीसाठी धान आणतात. मात्र हे केंद्र बंद असल्याने धान कुणाला विकावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. परिणामी काही शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे पडत्या भावात धान विकावा लागत आहे. सदर केंद्रावर मागील १५ दिवसांपासून धान पडून आहे, अशी माहिती शेतकरी किशोर वरवाडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. याशिवाय मुरूमगाव येथील केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने येथीलही केंद्र तीन ते चार दिवसांपासून बंद आहे. धानोरा येथील धान खरेदी केंद्रासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामाची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास महामंडळाच्या धानोरा येथील उपव्यवस्थापक कुंभार यांनी दिली. आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरातील देलनवाडी येथील धान खरेदी केंद्र गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. परिणामी या केंद्राच्या परिसरात शेतकऱ्यांचा धान उघड्यावर पडून आहे. सदर धान खरेदी केंद्रावर ८ हजार १५५ धानाची खरेदी झाली. आता देलनवाडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे गोदाम धानाने पूर्णत: भरले आहे. सुरुवातीला खरेदी केलेल्या धानाची उचल न झाल्याने नवीन धान खरेदीसाठी तसेच साठवणुकीसाठी गोदामात जागा नसल्याने शेतकऱ्यांचे धान उघड्यावर ठेवण्याची परवानगी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या देलनवाडी केंद्रावर ११० शेतकऱ्यांचे ३ हजार क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने हमीभाव धान खरेदी योजना सुरू केली. मात्र आदिवासी विकास महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे धान खरेदी प्रक्रियेत अनेक अडचणी येत आहेत. परिणामी शेतकरी त्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन थांबलेली धान खरेदी पुन्हा पूर्ववत तत्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी देलनवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर) मागील अनुभव लक्षात घेऊन आदिवासी विकास महामंडळाने उघड्यावर धान खरेदी बंद केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात प्रशासनातर्फे धान खरेदीचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. आॅनलाईन पद्धतीने खरेदी सुरू असल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लगेच धान चुकाऱ्याची रक्कम जमा होत आहे. थोडी गैरसोय सहन करावी, देलनवाडीचे धान खरेदी केंद्र लवकरच सुरू होईल. - भाऊराव घोडमारे, व्यवस्थापक, धान खरेदी केंद्र, देलनवाडी
गोदामाअभावी धान खरेदी झाली ठप्प
By admin | Published: December 29, 2016 1:15 AM