रब्बी हंगाम : उन्हाळी धानपिकांकडे शेतकऱ्यांचा कल गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने आधारभूत खरेदी योजनेंतर्गत सन २०१५-१६ च्या रब्बी हंगामात ४ कोटी १ लाख ७६ हजार ५९६ रूपये किंमतीच्या एकूण २८ हजार ४९४ क्विंटल उन्हाळी धानाची खरेदी करण्यात आली आहे. गतवर्षी सन २०१४-१५ च्या तुलनेत यंदा १७ हजार क्विंटलने उन्हाळी धानाची खरेदी वाढली आहे. यावरून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता उन्हाळी धानपिकाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे . आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत गतवर्षी सन २०१४-१५ च्या रब्बी हंगामात १ कोटी ७१ लाख ६० हजार रूपये किंमतीच्या ११ हजार क्विंटल उन्हाळी धानाची खरेदी करण्यात आली होती. आता शासनाच्या विविध योजनेतून अनेक शेतकऱ्यांनी विहीर, कृषिपंप, आॅईल इंजिन तसेच शेततळे आदींचा लाभ घेतला. त्यामुळे सदर शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक घेणे सुरू केले आहे. सन २०१४-१५ मध्ये सिंचनाच्या पाहिजे त्या प्रमाणात सुविधा नव्हत्या. मात्र आता कृषी, वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना लघु सिंचनासाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सन २०१५-१६ च्या रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळामार्फत एकूण ४२ धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. यापैकी ४१ केंद्र सुरू होते. यंदाच्या रब्बी हंगामात ११ केंद्रावरून एकूण २८ हजार ४९४ क्विंटल धानाची खरेदी दीड महिन्याच्या कालावधीत करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी) वर्षभरात दोन्ही हंगाम मिळून ३६ कोटींची धान खरेदी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने आधारभूत खरेदी योजनेंतर्गत सन २०१५-१६ च्या खरीप व रब्बी हंगामात एकूण ३६ कोटी ९७ लाख २९ हजार ९०३ रूपये किंमतीच्या २ लाख ६२ हजार २१९ क्विंटल इतकी धान खरेदी करण्यात आली. या धान खरेदीचे चुकारे संबंधित शेतकऱ्यांना महामंडळाच्या वतीने अदा करण्यात आले आहेत. बोनस देण्याची कार्यवाही सुरू आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने संस्थांच्या धान खरेदी केंद्रांवर धान विक्री केलेल्या संबंधित शेतकऱ्यांना क्विंटलमागे २०० रूपये बोनस दिला जातो. खरीप हंगामातील धानविक्री केलेल्या शेतकऱ्यांना धान चुकारे वा बोनसची रक्कम अदा करण्यात आली आहे. तर नुकत्याच आटोपलेल्या रब्बी हंगामातील धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस देण्याची कार्यवाही अलिकडेच सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गोदाम व ओठ्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणीच यंदा धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने महामंडळाचे नुकसान झाले नाही.
१७ हजार क्विंटलने धान खरेदी वाढली
By admin | Published: July 14, 2016 1:07 AM