शेतकरी अडचणीत : चार केंद्रांवर खरेदी ठप्पकुरखेडा : उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा यांच्या अंतर्गत तालुक्यातील धान खरेदी केंद्र संक्राती सणाच्या तोंडावरच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेकडो क्विंटल धान उघड्यावर आवारात पडून आहे. कुरखेडा तालुक्यातील कुरखेडा, गेवर्धा, देऊळगाव, खरकाडा, कढोली, पलसगड, खेडेगाव, पुराडा, येंगलखेडा, मालेवाडा या धान खरेदी केंद्राचा उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत समावेश होतो. गेल्या काही दिवसांपासून धान खरेदी केंद्र ग्रेडरची कमतरता असल्यामुळे एक किंवा दोन दिवसाआड बंद करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्रावर धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांचा माल आठ-आठ दिवस उघड्यावर पडून राहत आहे. ग्रेडर नसल्याचे कारण देत कुरखेडा, पलसगड, खरकाडा, कढोली हे केंद्र बंदच करण्यात आले आहे. चार दिवस खरेदी बंद राहिल, असे सांगण्यात आले आहे. सदर खरेदी केंद्र त्वरीत सुरू करावे, अशी शेतकऱ्याची मागणी आहे. या संदर्भात उपप्रादेशिक व्यवस्थापक वानखेडे यांना विचारणा केली असता, आपल्याकडे १० केंद्र असून पाच ग्रेडर कार्यरत आहे. त्यापैकी दोन ग्रेडरची नियुक्ती प्रशिक्षणासाठी झाली. ते ब्रह्मपुरीला गेले. तीनच ग्रेडर कार्यरत आहे. त्यामुळे खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले. याबाबत आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
ग्रेडरअभावी धान खरेदी केंद्र बंद
By admin | Published: January 13, 2017 12:48 AM