लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्यातील कुरंडी माल येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्था कुरंडी माल अंतर्गत वडेगाव येथे धानाची खरेदी करण्यात आली. परंतु येथील धानाची उचल न झाल्याने उघड्यावरच धान ठेवण्यात आले आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस येत आहे. या पावसामुळे धान भिजून प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरंडी अंतर्गत वडेगाव येथे आधारभूत धान खरेदी करण्यात आली आहे. येथील काही क्विंटल धानाची उचल करण्यात आली. परंतु उर्वरित धानाची उचल झाली नाही. २१ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास ५ वाजता अचानक वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे तसेच वादळवाऱ्यामुळे धानावर झाकलेल्या ताडपत्र्या फाटल्या. त्यामुळे पावसाचे पाणी धानाच्या पोत्यांमध्ये शिरले. पाणी शिरल्याने अनेक पोत्यातील धान कुजण्याची शक्यता आहे.या केंद्रावर आधारभूत खरेदी अंतर्गत २०१८-१९ या वर्षात १३ हजार ८९४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी ६ हजार ७५० क्विंटल धानाची उचल झाली. परंतु ६ हजार ९४४ क्विंटल धान उघड्यावर आहे. शिवाय वादळवाऱ्यामुळे ताडपत्र्या उडाल्या व काही ताडपत्र्या फाटल्या. त्यामुळे पावसाचे पाणी पोत्यांमध्ये शिरले. पोत्यांमध्ये पाणी शिरल्याने धान कुजण्याची शक्यता आहे. त्यामुळे धानाची उचल का करण्यात आली नाही, असा सवाल या परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.संचालक मंडळाने केला नुकसानीचा पंचनामा२१ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास वादळवाऱ्यासह पाऊस झाल्याने वडेगाव येथील धान भिजले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा कुरंडी माल येथील संचालक मंडळाने केला. तसेच उघड्यावर असलेल्या धानाची उचल करण्याची मागणी केली. याप्रसंगी सरपंच टिकेश कुमरे, सभापती प्रल्हाद गेडाम, सचिव पुरूषोत्तम कडाम, सुधाकर उसेंडी, धर्मा बावणे, श्रीपद मडकाम, के.एस.कुळसंगे, गणपत उईके, ऋषी बडे, बाबुराव मडावी, वैशाली गेडाम, यशवंत कांबळे, मनोहर भैसारे, मीनाक्षी मुर्वतकार उपस्थित होते.
खरेदी केलेले धान उघड्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:17 PM
आरमोरी तालुक्यातील कुरंडी माल येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्था कुरंडी माल अंतर्गत वडेगाव येथे धानाची खरेदी करण्यात आली. परंतु येथील धानाची उचल न झाल्याने उघड्यावरच धान ठेवण्यात आले आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस येत आहे. या पावसामुळे धान भिजून प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देवडेगाव केंद्रावरील स्थिती : अवकाळी पावसामुळे नुकसानीची शक्यता