भामरागडपासून ३ कि.मी. अंतरावर कोयनगुडा हे गाव आहे. येथे रामसू नवलू पुंगाटी व बंडी पुंगाटी हे आदिवासी वयोवृद्ध दाम्पत्य वास्तव्य करीत आहेत. अठराविश्व दारिद्र्यात जगणाऱ्या रामसू पुंगाटी हे घरातील अंधार अनेक वर्षांपासून पाहत आले आहेत. अर्धपोटी उपाशी राहून जीवनातील समस्या जाणल्या. पुंगाटी यांच्याकडे जुने वीज मीटर हाेते; परंतु वीज बिल न भरल्याचे कारण दाखवून मीटर काढून नेण्यात आले. त्यानंतर रामसू यांच्या घरात वीज पाेहाेचली नाही. रामसूच्या जीवनातील गरिबीने त्यांना पुन्हा अंधारात ढकलले. परिणाम पुंगाटी दाम्पत्याला अंधारात प्रकाश मिळविण्यासाठी शेकोटी पेटविल्याशिवाय पर्याय नाही. सदर बाब भामरागड पाेलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार नीलेश कुळधर, बाळू केकाण यांच्या नजरेत आली. त्यांनी भामरागडच्या पोलीस निरीक्षकांच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यानंतर उपविभागीय पाेलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात भामरागडचे ठाणेदार किरण रासकर यांनी चमूसोबत रामसू पुंगाटी यांची भेट घेतली. काही दिवसांतच त्यांच्या घरी वीज मीटर बसवून दिले. वयाेवृद्ध निराधार दाम्पत्यांच्या जीवनात पुन्हा प्रकाश पाेहाेचला.
बाॅक्स
जीवनावश्यक साहित्याचाही लाभ
काेयनगुडा येथील रामसू पुंगाटी यांच्या कुटुंबाला पाेलिसांनी जीवनावश्यक वस्तू दिल्या. यामध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू, भांडी, कपडे आदींचा समावेश आहे. काेराेना लाॅकडाऊन काळात गरीब व गरजूंना पाेलिसांकडून मदत दिली जात आहे. या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल एकप्रकारे आदिवासींच्या विकासासाठी एक दुवा म्हणून काम करीत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.