गडचिराेली : विदेशी दारूचा पुरवठा हाेत असलेल्या महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातील ५४ हजार रुपयांची बीअर गडचिराेली व चामाेर्शी पाेलिसांनी पकडल्याची कारवाई २३ सप्टेंबर राेजी गुरुवारला पहाटे ४.४५ वाजताच्या सुमारास चामाेर्शी येथे मुख्य मार्गावर केली.
याप्रकरणी पाेलिसांनी कपिल पुंडलिक काेकाटे (२८), सुनील बाबुराव बारई (४२) दाेघेही रा. नागपूर यांच्या विराेधात चामाेर्शी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे दाेन्ही आराेपी वाहन व दारूसाठा तेथेच ठेवून पसार झाले.
चारचाकी वाहनातून चामाेर्शीकडे दारू येत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानुसार पाेलिसांनी चामाेर्शी येथील बसस्थानकजवळ एका हाॅटेलजवळ पाळत ठेवली असता, महिंद्रा कंपनीचे चारचाकी वाहन येताना दिसले. पाेलिसांनी या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, आराेपींनी हे वाहन राेडवर उभे करून पाेबारा केला. पाेलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता, बीअरच्या ५०० मिली मापाच्या २१६ नग आढळून आले. या दारूची किंमत ५४ हजार रुपये आहे. याशिवाय वाहनातून दाेन स्मार्ट फाेन जप्त केले. तसेच आराेपींचे आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदी दस्तावेज मिळाले. दारू, माेबाईल व चारचाकी वाहन मिळून एकूण ५ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला.