जि. प. सीईओंची कारवाई : चौकशीत ग्रा.पं. च्या कामातील अनियमितता निष्पन्नगडचिरोली : २ आॅक्टोबर रोजीच्या ग्रामसभेला ग्रामसेवक गैरहजर राहिलेल्याच्या मुद्यावरून ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी पुलखल ग्राम पंचायतीला कुलूप ठोकून संबंधित ग्रामसेवकावर कारवाईच्या मागणीसाठी १७ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेवर पदयात्रा काढण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी पुलखल ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक जी. एम. पिंपळे यांच्यावर एक वार्षिक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात रोखण्याची कारवाई केली. यासंदर्भाचे जि. प. प्रशासनाचे पत्र शनिवारी पुलखल ग्राम पंचायतीला प्राप्त झाले.२ आॅक्टोबर रोजी ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी ग्राम पंचायतीला ठोकलेले कुलूप १६ आॅक्टोबर रोजी शुक्रवारला गडचिरोलीचे पंचायत विस्तार अधिकारी बोपनवार यांनी पोलिसांसमक्ष ग्राम पंचायतीचे कुलूप उघडले. २ आॅक्टोबर रोजी ग्रामसेवक पिंपळे रजेवर गेले होते. त्यांनी आपला कार्यभार मुडझा ग्रा. पं. च्या ग्रामसेविका लता मडावी यांच्याकडे सोपविला होता. पुलखल ग्रा. पं. चे ग्रामसेवक जी. एम. पिंपळे हे चौकशीदरम्यान नियमितपणे मुख्यालयी राहत नसल्याने निदर्शनास आले. तसेच ग्राम पंचायतीच्या कार्यालयीन कामात अनियमितता होत असल्याचे निष्पन्न झाले. यावरून महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तवणूक) नियम १९६७ मधील कलम ३ चा भंग केल्याने ग्रामसेवक पिंपळे यांच्यावर जिल्हा परिषदा जिल्हा सेवा १९६४ मधील कलम ४ (२) नुसार एक वर्षीय वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात येत आहे, असे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पुलखलच्या ग्रामसेवकाची वार्षिक वेतनवाढ रोखली
By admin | Published: October 18, 2015 1:38 AM