बोर्डाकडे पाठपुरावा करण्याची मागणी : दहावीच्या परीक्षेत कमी गुण टाकल्याचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सीबीएससी अभ्यासक्रमाच्या दहावीच्या परीक्षेत फॉरमेटिव्ह असेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना कमी गुण टाकल्याचा आरोप करीत. गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी परीक्षा बोर्डाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी पालकांनी कार्मेल हायस्कूलचे प्राचार्य यांना सोमवारी घेराव घालून व निवेदनाद्वारे केली आहे.सीबीएससी दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. कारमेल हायस्कूलमधून एकूण १५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना कम्युनिटिव्ह असेसमेंटमध्ये ए-१ श्रेणी मिळाली आहे. कम्युनिटिव्ह असेसमेंटचे गुण बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे गुण आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना चांगली श्रेणी मिळाली आहे. फॉरमेटिव्ह असेसमेंटचे गुण शाळेकडून टाकले जातात. हे गुण मात्र अतिशय कमी आहेत. काही विद्यार्थ्यांना डी, ई श्रेणी देण्यात आली आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याजोगेही गुण टाकण्यात आले नाही. त्यांना ग्रेस देऊन उत्तीर्ण करण्यात आहे. बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळविणारे विद्यार्थी शाळेच्या मूल्यांकनात कसे काय कमी पडू शकतात. असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळेने विद्यार्थ्यांचे गुण पाठविले नसावे किंवा पाठविलेले गुण बोर्डाला मिळाले नसावे असाही आरोप होत आहे. फॉरमेटिव्ह असेसमेंटमध्ये कमी गुण मिळाल्याने सीजीपीएची श्रेणी अत्यंत कमी मिळाली नाही. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. फॉरमेटिव्ह असेसमेंटमधील गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी बोर्डाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. कमी गुणांमुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडली आहे.त्यामुळे एखादा विद्यार्थ्याने जर जीवनाचे काही बरे वाईट केले तर याची पूर्ण जबाबदारी शाळेची राहील असे निवेदनात म्हटले आहे. बोर्डाकडे पाठपुरावा करून गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन प्राचार्यांनी दिले. यावेळी जमील शेख, गजानन बारसिंगे, डी. आर. उंदीरवाडे, करण कटारे, विलास मडकाम, गोपाल मिराणी आदी पालक उपस्थित होते.
पालकांची कार्मेल हायस्कूलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2017 12:49 AM