गडचिराेली : काेराेनाचे कमबॅक झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मागील काही दिवसांपासून गडचिराेली शहर व जिल्ह्यात १० च्या आतमध्ये काेराेनाबाधित रुग्णसंख्या राहात हाेती. मात्र गेल्या दाेन दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या जिल्ह्यात दुपटीने वाढत आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी एका मृत्यूसह नवीन बाधित २५ रुग्ण आढळून आल्याने शाळकरी मुलामुलींमध्येही काेराेनाची भीती वाढत आहे. दरम्यान, कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या आई-वडील तसेच भाऊ, बहीण व इतर सदस्यांना मास्क आवर्जून वापरा. तसेच बाहेरून आलेल्या सॅनिटायझरचा वापर करा, असे भावनिक आवाहन विद्यार्थी करीत आहेत.
मागील एक-दीड महिन्यांपासून इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी घराबाहेर पडत आहेत. या संकटामध्ये आपले पाल्य सुरक्षित राहणार की नाही, याची काळजी पालकांना आहे. तर एकूण वातावरण पाहता, विद्यार्थीही आता सतर्क झाले असून ते आई, बाबा, माेठे भाऊ, बहीण व घरातील इतर सदस्यांची काळजी करीत आहेत. वारंवार सॅनिटायझर, मास्क वापरण्याविषयी कुटुंबीयांना ते सांगत असल्याचे चित्र दिसून येते.
काेट
स्वत:ची काळजी घ्या आणि आईबाबांचीही काळजी घ्या!
प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तसेच आई-वडील, भाऊ-बहीण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे.
आई-वडिलांना कामानिमित्त बाहरे जावे लागते. बाहरे जाताना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का, सॅनिटायझर वापरले का, हेदेखील पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.
काेट
काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, वारंवार हात धुणे गरजेचे झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळले पाहिजे. काेराेनाची लक्षणे आढळून येताच तत्काळ तपासणी करून घ्यावी.
- डाॅ. विनाेद म्हशाखेत्री, सहायक आराेग्य अधिकारी, गडचिराेली
शालेय विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
काेराेना संसर्गामुळे वडील तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना मास्क, सॅनिटायझर लावण्याबाबत मी सांगत आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. आवश्यक असेल त्या ठिकाणी जा. मात्र काळजी घ्या, असे आम्ही सांगत आहाेत.
- राेहित बारसागडे, विद्यार्थी
शाळेमध्ये येताना आम्ही मास्क लावताे तसेच सॅनिटायझरचा वापर करताे. शिक्षक याबाबत आम्हाला वारंवार सूचना करीत असतात. कुटुंबीयांना याबाबत आम्ही सांगून काळजी घेण्याचे आवाहन करीत असताे.
- अरविंद राेहणकर, विद्यार्थी
सर्दी, ताप, खाेकला आला तर डाॅक्टरकडे अवश्य जा. सॅनिटायझर लावा. मास्कचा वापर करा. याबाबत आम्हाला शाळेत सांगितले जात आहे. आम्ही पण या सूचना आई-वडील व कुटुंबीयांना करीत आहाेत.
- साकेत डाेंगरे, विद्यार्थी
काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात आणण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे शाळेकडून व प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मी स्वत: काळजी घेत असून आई-वडील व माेठ्या भावाला मास्क वापरण्याबाबत सांगत असताे. गर्दी नसलेल्या ठिकाणी जाऊ नये, असे आम्ही सांगत आहाेत.
- शुभांगी काेटरंगे, विद्यार्थिनी
मागील काही दिवसांपासून काेराेनाने पुन्हा डाेके वर काढले आहे. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. काेराेनाचा संक्रमण टाळण्यासाठी आम्ही प्रशासनाने केलेल्या सूचनेनुसार वावरत आहाे. कुटुंबीयांनाही याबाबतची माहिती देत आहाेत.
- आर्या बाेरकुटे, विद्यार्थिनी
माझे बाबा बाहेर कामानिमित्त जाताना मास्क घालून जातात. मात्र आई फारशी मास्कचा वापर करीत नाही. आमच्या घरी सर्वांसाठी मास्क उपलब्ध करून दिले आहे. आई व माझ्या भावानेसुध्दा वडिलांप्रमाणे मास्कचा नियमित वापर करावा असे सांगताे.
- काजल मडावी, विद्यार्थिनी