देसाईगंज येथील प्रकार : वन विभागाचे दुर्लक्ष; कारवाई करण्याची मागणी देसाईगंज : आरमोरी मार्गावर वन विभागाने लाखो रूपये खर्चुन जैवविविधता उद्यान तयार केले आहे. या उद्यानात प्रेमीयुगुलांकडून अश्लिल चाळ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वन विभागाने आरमोरी मार्गावर जैवविविधता उद्यान तयार केले. या उद्यानात विविध प्रकारची वनौषधी, फुलझाडे लावण्यात आली आहेत. मुलांना खेळण्यासाठी घसरपट्टीसह इतर सुविधाही देण्यात आल्या आहेत. उद्यानाच्या माध्यमातून थोडा मोकळा श्वास घ्यायला मिळत असल्याने अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह सायंकाळच्या सुमारास उद्यानात जातात. सदर उद्यान प्रेमीयुगुलांसाठीही महत्त्वाची जागा ठरत आहे. एखाद्या आडोशाला प्रेमीयुगुल अश्लिल चाळे करत राहतात. त्यामुळे कुटुंबासह गेलेल्या नागरिकांची चांगलीच पंचाईत होते. या प्रेमीयुगुलांवर नजर ठेवणे वन विभागाने आवश्यक आहे. मात्र वन विभाग केवळ तिकीट फाडून मोकळे होतात. उलट प्रेमीयुगुलांमुळे तिकीट जास्त खपत असल्याने वन कर्मचारी या जोडप्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी दिवसेंदिवस प्रेमीयुगुलांची हिंमत वाढत चालली असून सर्रासपणे अश्लिल चाळे केले जात आहेत. उद्यानात येणाऱ्यांकडून ५ रूपयाची तिकीट घेतली जाते. प्रत्येकाची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. कुटुंबासह गेलेल्या व्यक्तीला माहिती विचारली जाते. मात्र बुरखाधारी प्रेमीयुगुलांची माहिती रजिस्टरवर नोंदविली जात नाही. वन विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष न दिल्यास उद्यानात कुटुंबासह फिरणाऱ्यांची संख्या पूर्णपणे रोडावेल व प्रेमीयुगुलांचीच संख्या वाढण्याची संख्या नाकारता येत नाही. त्यामुळे कारवाईची मागणी आहे. (वार्ताहर)
उद्यानात वाढले पे्रमीयुगुलांचे चाळे
By admin | Published: March 15, 2017 1:59 AM