आगारात गर्दी : हंगामी तिकीट वाढीचा परिणाम; एसटीलाही हजारो रूपयांचा फटकागडचिरोली : एसटी महामंडळाने २२ आॅक्टोबरपासून दिवाळीनिमित्त हंगामी १० टक्के भाडे वाढ केली आहे. मात्र या भाडेवाढीचे सॉफ्टवेअर तिकीट मशिनमध्ये लोड होण्यास विलंब होत असल्याने गडचिरोली आगारातील बहुतांश बसफेऱ्यांना शनिवारी तीन ते चार तासांचा उशीर झाला. परिणामी प्रवाशांना बसस्थानकावरच दोन ते तीन तास वाट पाहत बसावे लागले. दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा आर्थिक लाभ उचलण्याच्या उद्देशाने एसटीच्या केंद्रीय कार्यालयाने २२ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत १० टक्के भाडेवाढ केली आहे. सदर भाडेवाढ २२ आॅक्टोबरच्या रात्री १२ वाजेपासूनच लागू झाली आहे. झालेली भाडेवाढ तिकीट मशिनमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक होते. मात्र शनिवारी दिवसभर डेटा डाऊनलोड होण्यास विलंब होत असल्याने एसटीचे अनेक शेड्यूल विलंबाने गेले. सकाळचे काही शेड्यूल तब्बल दोन ते तीन तासाने विलंब झाले. सकाळी ७ वाजताच्या बसेस ९ ते १० वाजता सोडण्यात आल्या. परिणामी सकाळच्या विद्यार्थ्यांना शाळा गमवावी लागली. तर काही प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास करावा लागला. दुपारी १ वाजेनंतर पुन्हा तांत्रिक बिघाड निर्माण झाला. दुपारी १ वाजताचे शेड्यूल दुपारी ३ वाजेपर्यंत सुटले नव्हते. परिणामी दुपारीही आगारात प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. प्रवाशी चौकशी विभागात जाऊन याबाबत चौकशी करीत होते. त्यावेळी संगणकामध्ये काही तरी तांत्रिक बिघाड निर्माण झाला असल्याने बसफेरीला विलंब होत आहे. मात्र बसफेरी नेमकी कधी सुटेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही, असे उत्तर दिले जात होते. त्यामुळे प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेत पुढचा प्रवास करण्यास पसंती दर्शविली. एसटी विभागाने आदल्या दिवशी दिलेल्या वेळापत्रकानुसार एसटीचे वाहक व चालक एसटी बसस्थानकात आले. मात्र तिकीट मशिनच मिळत नसल्याने आगारातच प्रतीक्षा करीत थांबावे लागले. वाहक व चालकही त्रस्त असल्याचे दिसून येत होते. या प्रकारामुळे एसटीलाही हजारो रूपयांचा फटका बसला. (नगर प्रतिनिधी)
एसटीच्या विलंबाने प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2016 1:31 AM