सभेत भागीरथा दूधबावणे म्हणाल्या, बहुतांश अंगणवाडीसेविका कमी शिकलेल्या आहेत. २०१४ पर्यंत त्यांची शैक्षणिक पात्रता आठवा वर्ग होती. त्यामुळे बहुतांश अंगणवाडीसेविका मॅट्रिकदेखील नाही. आजपर्यंत मोबाइलच्या माध्यमाने आम्ही मराठीतून माहिती पाठवित होतो. आता इंग्रजीतून माहिती पाठविण्यास सांगण्यात येते की, जे आम्हाला शक्य नाही. आमच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार न करता तुम्हाला काम येत नसेल तर राजीनामा द्या, तुमचे मानधन काढणार नाही. अशा धमक्या देऊन अंगणवाडीसेविका महिलांना मानसिक त्रास दिला जात आहे. ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.
प्रा. दहिवडे म्हणाले, सतत वाढणाऱ्या महागाईमुळे जनतेला जगणे कठीण झाले आहे. मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याऐवजी महागाईमुळे घट होत आहे. मानधन वाढ आणी पेन्शन या प्रमुख मागणीला घेऊन बेमुदत संपाशिवाय दुसरा पर्याय अंगणवाडी महिलांपुढे राहिलेला नाही, असे मार्गदर्शन केले. आभार मालूताई कामदार यांनी मानले. सभेला शोभा वासेकर, चंदा कन्नाके, सरोज नागदेव, भारती इपकलवार, वैशाली भांडेकर आदी उपस्थित होत्या.