पुरूषाेत्तम भागडकर
देसाईगंज (गडचिरोली) : येथील कुथे पाटील कान्व्हेंटमध्ये दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या प्राची राधेश्याम सोंदरकर या विद्यार्थिनीच्या वडिलांचा उपचारादरम्यान नागपूर येथे ६ मार्च राेजी मृत्यू झाला. याच दिवशी प्राचीचा इंग्रजीचा पेपर हाेता. मृत्यूची बातमी माहीत हाेताच कुटुंबीयांनी टाहाे केला. अशा दु:खमय वातावरणात प्राची पेपर देणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात हाेती. मात्र, गावकरी, नातेवाईक व शिक्षकांनी सांत्वन केल्यानंतर ती पेपर देण्यास तयार झाली. केंद्रावर वेळेवर पाेहाेचून पेपर दिला.
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथून राधेश्याम सोंदरकर हे १८ फेब्रुवारी रोजी स्वगावी सोनी येथे दुचाकीने यायला निघाले हाेते. गावाजवळ एका चारचाकी वाहनाने दिलेल्या जबर धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना लागलीच उपचारार्थ ब्रह्मपुरी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना नागपूरला हलविण्यात आले. वडिलांची प्रकृती नाजूक व खालावलेल्या स्थितीत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, बोर्डाची परीक्षा सुरू झाली. मराठीचा पेपरदेखील तिने अश्रूतच दिला होता.
दरम्यान, ६ मार्चला इंग्रजीचा पेपर असतानाच नियतीने डाव साधून वडिलांना हिरावून घेतले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पोहोचताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. त्यातच आजच देसाईगंज येथील आदर्श इंग्लिश हायस्कूल केंद्रावर इंग्रजीचा पेपर असल्याने प्राची पेपर देण्यासाठी तयार होईल किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला असतानाच गावकरी, नातेवाईक व शिक्षकांनी तिला धीर देत परीक्षा केंद्रावर आणले. वडील मरण पावल्याचे दु:ख पचवत तिने पेपर दिला. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पुरुषोत्तम चापले, आदर्श महाविद्यालयाचे प्रा. दामोदर शिंगाडे यांनी मुलीला पेपर सोडविण्यासाठी धीर दिला.
पेपर साेडवून अंत्ययात्रेत सहभागी
- गावकरी, नातेवाईक व शिक्षकांनी धीर दिल्यानंतर ती पेपर साेडविण्यासाठी गेली. ताेपर्यंत वडिलांचा मृतदेह नागपूरवरून घरी आणण्यात आला. अंत्ययात्रा काढण्यासाठी तिची प्रतीक्षा हाेती. ती येताच अंत्ययात्रा काढण्यात आली. यात तिही सहभागी झाली.
- प्राचीला एक लहान बहीण आहे. प्राची ही माेठी आहे. कमी वयात पितृछत्र हिरवल्याने कुटुंबाची जबाबदारी आता प्राचीवर येऊन पडली आहे.