गडचिरोली : निवडणूक संपून दीड महिन्यांचा कालावधी उलटूनसुद्धा गडचिरोली जिल्हातील बहुतांश तालुक्यांमध्ये निवडणुकीकरिता नियुक्त कर्मचाऱ्यांचे मानधन अजूनही मिळालेले नाही. तरी ते तत्काळ अदा करावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना गडचिरोली तर्फे करण्यात आली. याबाबत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका दोन टप्प्यांमध्ये जानेवारी २०२१ मध्ये पार पडल्या. या निवडणुकांचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करण्यासाठी केंद्राध्यक्ष, इतर मतदान अधिकारी म्हणून नेमणुका केलेल्या होत्या.
गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीचे काम करणे हे अतिशय जोखमीचे काम असून हे सर्वश्रुत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या नियुक्तीच्या मतदान केंद्रावर पोहाेचविण्यासाठी निवडणूक साहित्यांसह अनेक किमीचा पायदळ प्रवास करावा लागतो. आपले कार्य पार पाडावे लागते. असे असून सुध्दा सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांनी शासनाने सोपविले कार्य व्यवस्थितपणे व जबाबदारीने पार पाडले.
निवेदन देताना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, संघटक सचिव सुरज हेमके, सहकार्यवाह माणिक पीलारे, आनंदराव बगमारे, खुशाल मडावी आदी उपस्थित होते.