लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कामाची व्यवस्था, धावपळीचे जीवन, घरी वाहन नाही, अशावेळी बरेचसे आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करण्यावर शहरातील नागरिक भर देतात. यामध्ये ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन वस्तू मागविणे, विविध प्रकारचे बिल अदा केले जात आहे. आता नगर पालिकेचा कर विभाग हायटेक झाला असून, शहरवासीयांना मालमत्ता व पाणीपट्टी कर घरबसल्या अदा करता यावा, यासाठी मालमत्ताधारकांच्या मागणी पत्रावर क्यूआरकोडची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नप हद्दीतील नागरिकांना नगरपरिषद कार्यालय गाठून रोखीने घरपट्टीसह विविध कर भरावे लागत होते. मात्र, नगर परिषदेने एक पाऊल पुढे टाकत कराची रक्कम ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना नगर परिषद कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत.
जिल्ह्यात तीन नगर परिषदा आणि ९ नगर पंचायती आहेत. ज्यामध्ये गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या नगर परिषदेचा समावेश आहे. इतर तालुक्यांमध्ये नगर पंचायती आहेत. जिल्ह्यातील तीन नगर परिषदांपैकी गडचिरोली ही घरपट्टी व इतर कराची रक्कम ऑनलाइन स्वीकारणारी पहिली नगर परिषद ठरली आहे. शहरातील अनेक लोक स्मार्ट फोन वापरत असून आता करही मोबाईलद्वारे भरणा होत आहे.
गडचिरोलीकरांवर ८ कोटी ६९ लाखांचा कर नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सुधारित कर आकारणी करण्यात आली असून, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जुनी थकीत व चालू वर्षाचे मिळून एकूण ८ कोटी ६९ लाख ५७ हजार रुपयांची मालमत्ताकराची मागणी आहे. यामध्ये १ कोटी ४८ लाख रुपयांची जुनी थकबाकी आहे. चालू वर्षात ७ कोटी २१ लाख रुपये मालमत्ता करापोटी नगरपालिकेला उत्पन्न येणे आहे.
शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार सुरू १ गडचिरोली नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कॉम्प्लेक्स परिसर, तसेच शहराच्या विविध भागांत असलेल्या शासकीय कार्यालयांना मालमत्ता कर आकारले जाते. यामध्ये पोलिस अधीक्षक कार्यालय, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागांच्या कार्यालयांचा समावेश आहे.
या कार्यालयाकडे गेल्या २ अनेक वर्षापासून लाखो रुपयांची मालमत्ता कर थकीत आहे. अदा करण्यासाठी लगबगीने कार्यवाही होत नसल्याने नगर परिषद प्रशासनाच्या वतीने संबंधित कार्यालय प्रमुखांना पत्र देऊन कराचा भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर कार्यवाही न झाल्यास त्या कार्यालयात पथक धडकणार आहे.
मालमत्ता धारकांची वाढली संख्या शहराच्या विविध भागात गेल्या वर्षभरात अनेक कुटुबियांनी घराचे बांधकाम केले. त्यामुळे शहरात मालतत्ताधारकांची संख्या वाढली अआहे. शहरात २३ वॉर्ड असून लाखो लोक वेगवेगळ्या वॉर्डात राहतात. वॉर्डामध्ये रस्ते, वीज, नाली, शिक्षण, पाणी आदी मूलभूत सुविधा नगरपरिषदेमार्फत पुरविल्या जातात. या सुविधांच्या बदल्यात कर आकारणी होते.
"सन २०२४-२५ पासून नगर परिषदेने कराची रक्कम ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बिलावर क्यूआर कोड दिलेला आहे. स्कॅन करून कराची रक्कम भरता येईल. या सुविधेसाठी नागरिकांना पावती घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयात यावे लागणार नाही. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतरच संबंधित मोबाइलधारकाला लगेच पावती मिळाल्याचा संदेश येईल."- स्वप्नील घोसे, कर निरीक्षक, नगर परिषद, गडचिरोली.