आरमोरी : रोजगार हमी योजनेंतर्गत आरमोरी येथील फॉरेस्ट डेपो ते बन्सोड गुरूजी यांच्या शेतापर्यंत पांदन रस्ता तयार करण्याचे काम करण्यात आले. परंतु सदर कामाची मजुरी चक्क ५० रूपये काढल्याने मजुरांवर अन्याय करण्यात आला. त्यामुळे मजुरांना सुधारित नियमानुसार किमान १६५ रूपये मजुरी देण्यात यावी, अशी मागणी मजुरांनी जि. प. सदस्य अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार चंदावार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत पांदन रस्त्याचे काम २६ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान करण्यात आले. काही दिवसानंतर मजुरांना कामाचा मोबदला म्हणून ५० रूपये मजुरी काढण्यात आली. त्यामुळे निराश झालेल्या मजुरांनी तहसील कार्यालय गाठून सुधारित रोहयो मजुरी देण्याची मागणी तहसीलदारांकडे निवेदनातून केली. मजुरी संदर्भात अभियंता उराडे व तहसीलदार चंदावार यांच्याशी मजुराच्या शिष्टमंडळाने चर्चा केली व मजुरीचा प्रश्न त्वरित निकाली काढण्याची मागणी केली. यावेळी नायब तहसीलदार बन्सोड, तुपट, संदीप गोंधोळे यांच्यासह रोहयो महिला व पुरूष मजूर उपस्थित होते.
सुधारित नियमानुसार रोहयो मजुरी द्या
By admin | Published: May 19, 2014 11:32 PM