गडचिराेली : हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे वेतनश्रेणी नमूद असलेले आदेश पारित करून त्यानुसारच वेतन अदा करावे, अशी मागणी महाराष्ट्र कास्ट्राईब शासकीय कर्मचारी संघटनेने जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा हिवताप कार्यालयातून हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता मजुरी पद्धतीने फवारणीचे काम करण्याकरिता आदेश पारित करून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. हा अन्याय कर्मचारी खपवून घेणार नाही. हिवताप कार्यालयामार्फत अनेक वर्षांपासून फवारणीचे काम वेतनश्रेणीनुसार करीत असून यावर्षी सुद्धा कार्यालयाकडून हेतूपुरस्सर मजुरी पद्धतीने आदेश पारित करण्यात आले. या माध्यमातून फवारणी कर्मचाऱ्यांची दिशाभूल झाली. दरवर्षीप्रमाणे वरिष्ठ क्षेत्र कर्मचारी व क्षेत्र कर्मचारी यांना वेतश्रेणीनुसार आदेश पारित करूनच त्यानुसार वेतन काढण्यात यावे, अन्यथा फवारणी कर्मचारी फवारणीचे काम सुरू करणार नाही. याबाबत लवकर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा व संघटनेला कळवावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष विनाेद सेलाेटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे.