‘मॅट’चे निर्देश : अवमाननाप्रकरणी निकाल लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मॅटच्या निकालाला न जुमानताच स्वत:च्या मर्जीने वनपालाची बदली केल्या प्रकरणी मॅटने गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक शिवाजीराव फुले यांना त्यांच्या पगारातून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत वनपालाला वेतन द्यावे, असे निर्देश ६ जुलै रोजी दिले आहेत. त्यामुळे वन विभागात एकच खळबळ माजली आहे. धानोरा तालुक्यातील येरकड येथे वनपाल म्हणून कार्यरत असलेल्या मनोहर बगमारे यांनी स्वत:ची बदली देसाईगंज येथे व्हावी, अशी विनंती केली होती. मात्र त्यांची विनंती लक्षात न घेता त्यांची बदली आलापल्ली येथील वन्यजीव विभागात केली होती. वन्यजीव विभागात ५० वर्षाहून अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्याची बदली करता येत नाही, असा नियम असतानाही बगमारे यांची बदली करण्यात आली. याविरोधात बगमारे यांनी मॅटमध्ये प्रकरण दाखल केले. बगमारे यांचे वय लक्षात घेऊन त्यांना कार्यमूक्त करू नये, असा निकाल मॅटने १३ जून रोजी दिला. मात्र मॅटच्या निकालाला न जुमानताच उपवनसंरक्षक शिवाजीराव फुले यांनी मनोहर बगमारे यांना कार्यमूक्त केले. या विरोधात बगमारे यांनी पुन्हा मॅटमध्ये धाव घेतली व मॅटच्या निकालाचा अवमान केल्याचे मॅटच्या लक्षात आणून दिले. यावर ६ जुलै रोजी मॅटने निकाल दिला असून या निकालात उपवनसंरक्षकांनी मॅटच्या निकालाचा अवमान केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत फुले यांनी बगमारे यांना स्वत:च्या खिशातून वेतन द्यावे, अशा प्रकारचा निकाल दिला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निकाल लागल असल्याचे बोलले जात आहे.
उपवनसंरक्षकांनी स्वत:च्या खिशातून द्यावे वनपालाला वेतन
By admin | Published: July 12, 2017 1:32 AM