सर्वसामान्य रूग्णांना कोविड उपचारासाठी खाजगी दवाखान्यात किती शुल्क असावे याबाबत शासनाकडून दर निश्चित करून दिले आहेत. त्या अनुषंगाने बाधितांवर उपचारासाठी आकारलेले दर योग्य आहेत किंवा नाही याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केला आहे. यामध्ये नेमलेल्या लेखापरीक्षकाकडून रूग्णांना आकारलेली देयके तपासून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जर दरांची आकारणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.२१ मार्च २०२१ च्या आदेशानुसार नसेल तर जास्तीचे आकारलेले पैसे संबंधित रूग्णाला परत करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्ह्यातील तिन्ही खाजगी रूग्णालयांना देण्यात आले आहेत. कोरोना चाचणी करण्यासाठीही सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या दि.३१ मार्च २०२१ च्या आदेशान्वये दर आकारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णालयाकडून दिलेल्या बिलाबाबत तक्रार असल्यास जिल्हा कोविड नियंत्रण कक्षामधील ०७१३२-२२२०३०, २२२०३५ या क्रमांकावर तक्रार करता येईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले.
(बॉक्स)
जिल्ह्यात तीन खासगी कोविड रुग्णालये
जिल्ह्यात सध्या आरोग्य विभागाच्या मंजुरीनुसार तीन खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात डॉ.कुंभारे व डॉ.दुर्गे यांचे बोदली येथील कोविड हॉस्पिटल, डॉ.अभय बंग यांचे चातगाव येथील सर्च संस्थेचे रुग्णालय, आणि गडचिरोलीलगत नवेगाव येथील नोबेल कोविड रुग्णालय या तीन खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. सर्चच्या रुग्णालयाला प्रशासनाकडून कोरोना उपचारासाठी नुकतीच परवानगी देण्यात आली आहे.