प्रदीप बोडणे लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : पावसाळ्यापूर्वी मोराचा विणीचा काळ असतो. नंतर त्याचा पिसारा झडून जातो. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत जंगलात मोरपीस हमखास सापडतात. ग्रामीण भागात शेतकरी दिवाळीच्या सणाला गोवर्धन पूजेला गाय-म्हशी सजविण्यासाठी मोराच्या पिसांचा वापर करतात. पण, हे मोरपीस आता पूर्व विभागाच्या जंगलात सापडत नाही. कारण सुंदर दिसणाऱ्या या पक्ष्याची मोठ्या प्रमाणात शिकार झाली आणि पूर्व विदर्भाच्या जंगलातून मोराची किंचाळी लुप्त झाली आहे.
निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सुंदर पक्षी म्हणजे मोर, याच्या आकर्षक रंगामुळे या पक्ष्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. पूर्व विदर्भातील झाडीच्या जंगलात या पक्ष्यांची संख्या मोठी होती. कृमी-कीटक, गवत, धान्य हे त्याचे अन्न. झुडपी जंगलात मोरांचा वावर होता. वर्षभर जंगलात मिळेल त्या ठिकाणी आसरा करून राहणारा मोर विणीच्या काळात मात्र नर आणि मादी एकत्र येतात. घरटी बांधतात आणि पिलाला जन्म देतात.
विणीचा काळ ओळखून शिकारीचे अघोरी कृत्य करणारे लोक त्याचे घरटे हेरून घरट्यात एक विशिष्ट चिकट पदार्थ टाकून ठेवतात. त्यात मोर अडकतो. अशा पद्धतीने शिकारी झाल्या आणि मोर नष्ट झाले.
वडसा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या वैरागड, वासाडा, रामाडा, इंजेवारी, शिरपूर, आरमोरी, पळसगाव, भगवानपूर, सावलखेडा, कराडीचे जंगल मोरांच्या निवासाचे जंगल म्हणून ओळखले जायचे. जंगलात वावर असणारे आणि रानवाटांना जाणाऱ्या लोकांना मोर हमखास दृष्टीत पडायचे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत जंगलात गुरे चारायला नेणारे गुराखी हमखास पाच-दहा मोरपिसे जंगलातून घेऊन घरी परतायचे. त्याच्या निवान्यासाठी जंगल अनुकूल असायचे, जंगल झपाट्याने नष्ट झाले आणि निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा मोर नष्ट झाला. तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी झाली असताना मांसभक्षी प्राण्यांची संख्या वाढली आहे. परिणामी वाघ, बिबट्यांचे माणवावर हल्ले वाढले आहेत.
एफडीसीएमने केले जंगल नष्ट जंगलाची मोठ्या प्रमाणात हानी केली ती वन विकास महामंडळाने. एकत्रीकरणाच्या नावावर जंगलाची विल्हेवाट लावली आणि उरले-सुरले जंगल लोकांनी तोडून नेले. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांचा गवताळ झुडपी जंगलाचा निवारा नष्ट झाल्याने हरीण, ससा, मोर, लांडोर हे तृणभक्षी प्राणी, पक्षी शिकाऱ्यांच्या हाती गवसले. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या संस्थेने नुकताच प्रकाशित केलेल्या अहवालाचा विचार केला तर सन १९७२ पासून आतापर्यंत तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत तब्बल ७० टक्क्यांनी घट झाली. याचे मुख्य कारण म्हणजे जंगलांना लागणारे वनवे, जंगलाचे कमी होणारे प्रमाण, जंगलातील जैवविविधता नष्ट होणे यांचा परिणाम आहे.
"जंगल नष्ट होत असल्यामुळे गडचिरोलीच्या जंगलातील मोर जवळपास नष्टच झाले आहेत. पक्ष्यांमध्ये सर्वात सुंदर असलेला हा पक्षी आहे. उंच असल्याने तो जास्त उडू शकत नाही. त्यामुळे त्याची शिकार सहज करता येते."- फाल्गुन मेहेर, वन्यजीव प्रेमी