लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : येथील स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा व्याजासह रक्कम भरणा करून कर्जाचा भार हलका केला. मात्र, खरीप हंगामाची चाहूल लागली असली तरी व्याजाच्या रकमेचा परतावा मिळत नसल्याने नवीन हंगामासाठी पीककर्ज घ्यावे की नाही, याबाबत बळीराजा संभ्रमात आहे. सध्या व्याज परताव्याच्या रकमेसाठी शेतकरी बँकेत हेलपाटे मारत आहेत.
शेतकऱ्यांनी आर्थिक धमणी म्हणून जिल्हा बँकेची ओळख आहे. यंदा बँकेच्या धोरणात बदल झाला असून प्रती तीन लाख रुपयांच्या पीककर्जावर सहा टक्के व्याज व त्यावरील कर्जावर १० टक्के व्याज लावून परतफेड करावे लागले. नियमित भरणा करणाऱ्या कास्तकरांचे यात नुकसान झाले असून ३१ मार्चच्या मुदतीनंतर व्याजाची रक्कम १२ टक्के होणार असल्यामुळे शेतकरी बांधवांची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी झाली होती. व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये परत मिळणार या आशेने बळीराजाने तडजोड करून रक्कम जुळवली; परंतु अजूनपर्यंत व्याजाच्या रकमेची कोणतीच अधिकृत महिती बँकेत आली नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
अहेरी, देवलमारी, इंदाराम, आवलमारी, महागाव व राजाराम अशा एकूण सहा आदिवासी सहकारी सोसायट्यांचे जिल्हा बँकेच्या अहेरी शाखेत खाते आहे. सर्व १२४ शेतकऱ्यांनी वेळेत कर्जपरतफेड केली. सुमारे १२ लाख रुपयांचे व्याज बँकेकडे थकीत आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण ५५शाखांमधील ४७ शाखांमध्ये पीक कर्ज वाटप करण्यात येते. व्याजाच्या रकमेचा तपशील मागविण्यात आला आहे. जवळपास ४० शाखांचे तपशील प्राप्त झाले असून इतर उर्वरित शाखांचे तपशील मिळताच शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम परत करण्यात येईल.- आर. वाय. सोरते, सरव्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोली