कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना मास्क व सॅनिटायझर वापरून सुरक्षित अंतर ठेवावे व स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. तरीही लोक मास्क न घालता बाहेर फिरत आहेत. अशा मास्क न घालता फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा प्रशासनाने उचलला आहे. कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून प्रशासनाने पुन्हा कडक पावले उचलली आहेत. जो मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरतो त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारण्यात येत आहे. प्रत्येक तालुका ठिकाणी महसूल, पोलीस व नगरपरिषदचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहेत. हे पथक जे लोक मास्क न वापरता फिरतात त्यांच्यावर निगराणी ठेवून त्यांच्याकडून दंड आकारून दंडाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मात्र मास्क न वापरता फिरणाऱ्यांकडून दंड आकारताना दंडाच्या रकमेतून त्या इसमाला किमान दहा रुपयांचा मास्क दिल्यास तो मास्क त्या ठिकाणावरून लावून जाईल व त्याला त्याची जाणीव वेळोवेळी होईल आणि इतरांनाही मास्क वापरण्यास सांगेल. काेराेनामुळे नगर परिषद, नगर पंचायत यांच्याकडे दंडाच्या माध्यमातून लाखाे रुपये जमा झाले आहेत. या रकमेचा सामाजिक कार्यासाठी वापर हाेणे अपेक्षित आहे.
दंड आकारताय! मास्क पण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:32 AM