काेराेनामुळे मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये यासाठी वेगवेगळ्या मार्गाने शिक्षण देण्याचा शासन-प्रशासनाचा प्रयत्न असला तरी तो फसत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश पालक शेतकरी, कामगार असल्याने ते शेतात व कामावर आपल्या मुलांनाही नेतात. त्यांच्याकडे ॲन्ड्राॅईड मोबाईल नाही, दुर्गम भागात नेटवर्क नाही, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शिक्षणाचे विशिष्ट उद्दिष्ट साध्य व्हावे, शैक्षणिक नुकसान भरून निघावे यासाठी इयत्ता दुसरी ते दहावीसाठी १ जून ते १४ ऑगस्टपर्यंत ४५ दिवस राबविण्यात येत असलेला ‘सेतू अभ्यासक्रम’ अपयशी ठरत आहे. ही बाब हेरून व विद्यार्थ्यांना याचा लाभ योग्यप्रकारे मिळणार नाही म्हणून ग्रामपंचायत, ग्राम सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आदींनी एकमताने कोविडचे नियम पाळून गटा-गटाने सुरक्षित पद्धतीने विद्यार्थ्यांना शाळेत बाेलाविण्याचा निर्णय घेतला. येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत विद्यार्थी ४५ दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी येत आहेत. ‘आमची शाळा, आमची जबाबदारी, आमचा निर्णय’ याचा अवलंब गावकऱ्यांनी केला आहे. सुरक्षितता म्हणून विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर व इतर वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक खुर्शिद शेख, सरपंच रमेश तैनेनी, उपसरपंच सुधाकर मिसरी, राजू जैनवार, गजानन कलाक्षपवार, ग्रामपंचायत सदस्य सर्वेश्वरराव गुडुरी, तंमुस अध्यक्ष चंद्रशेखर पुलगम, राजू जैनवार, श्रीकांत सुगरवार, सतीश तिरुनगरी, व्यंकना चौधरी, लक्ष्मी अल्लपू, विजय तुमडे, श्रीकांत तोरकरी, रंजीत चिंताकानी, जनार्धन तोगेटी, हेमंत रोड्डावर, श्रीनिवास रंगू आदी सहकार्य करीत आहेत.
बाॅक्स
काेराेनापासून पळू नका तर लढा !
शालेय विद्यार्थ्यांना काेराेना विषाणूचा संसर्ग हाेऊ नये यासाठी मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. काेराेनाबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. परंतु कोरोनापासून दूर पळणे हा मार्ग नसून ‘सुरक्षित पद्धतीने लढणे’ हाच खरा उपाय आहे, हे सूत्र आसरअल्लीवासीयांनी अवलंबले. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून काैतुक केले जात आहे.