रस्ता व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन : आलापल्ली-सिरोंचा मार्गावर वाहतूक ठप्पमुलचेरा/राजाराम खांदला : मुलचेरा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावाव्या, या मागणीसाठी अब्दुल जमीर हकीम यांच्या नेतृत्वात मुलचेरा येथील सुभाषचंद्र चौकात गुरूवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर अहेरी तालुक्यातील गोलाकर्जी परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष जमीर हकीम यांच्या नेतृत्वात सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील गोलाकर्जी येथे गुरूवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनदरम्यान सुमारे तीन तास वाहतूक ठप्प पडली होती. मुलचेरा तालुक्यातील रस्त्यांची दुरूस्ती करावी, अतिक्रमणधारकांना वनपट्ट्यांचे वितरण करावे, चेन्ना सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करावे, मुखडी ग्रामपंचायत, आंबटपल्ली ग्रामपंचायत व गोविंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व गावांचे सर्वेक्षण करून ताबडतोब उपसा जलसिंचन योजना मंजूर करावी, प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीत हलविण्यात यावे, वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असून वन विभागाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर ते मुखडी फाटा, मोहुर्ली ते कोठारी, कोठारी ते कांचनपूर, भगतनगर ते सुंदरनगर रस्त्यांची दुरूस्ती मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात यावी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मुलचेरा तालुक्यातील एकही रस्ता समाविष्ट करण्यात आला नाही. मुलचेरा येथे बसस्थानक निर्माण करावे, मुलचेरा ते मार्र्कंडा, मुलचेरा-कोपरअल्ली-अंबेला-घोट, मुलचेरा ते एटापल्ली, कोपरअल्ली चेक ते शांतीग्राम, मुलचेरा ते कुदीरामपल्ली मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी आदी मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रशासनातर्फे नायब तहसीलदार पठाण, पोलीस अधिकारी ठाकरे, वनाधिकारी मढेवार, एसटी विभागाचे राकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे भुजने, आरोग्य विभागाचे डॉ. काकडे उपस्थित होते. आंदोलनादरम्यान मुलचेराचे नगराध्यक्ष सुभाष आत्राम, उपाध्यक्ष देवा चौधरी, दीपक परचाके, नामदेव कुसनाके, माजी सरपंच रणजीत स्वर्णकार, नीलकमल मंडल, उमेश पेडुकर, युद्धिष्ठीर बिश्वास, टिल्लू मुखर्जी, लतीफ शेख, गणपत मडावी, ईश्वर मडावी, शैलेश खराती, निकुले, विष्णू रॉय, तपन पांडे, सुबोल बिश्वास, निखील इज्जतदार, मनोज कर्मकार, सुभाष पटेल, सुरेंद्र अलोणे, अप्पू मुजुमदार यांच्यासह शेकडो गावकरी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
मुलचेरा, गोलाकर्जीत नागरिकांनी केला ‘रास्ता रोको’
By admin | Published: September 30, 2016 1:31 AM